कुंभमेळेत मृत्युमुखी पडलेल्या बेळगावच्या चार भाविकांना घेऊन विशेष विमानाद्वारे बेळगावला रवाना
वाराणासी येथील प्रदेश कार्यसमिति सदस्य,भाजप युवा मोर्चाचे प्रियांशु कुमार तिवारी यांनी खास तरुण भारत न्यूज बेळगावला ही अधिकृत माहिती दिली
प्रयागराज ( उत्तर प्रदेश ) : प्रयागराज येथे कुंभमेळ्यातील शाहीस्नानावेळी घडलेल्या चेंगराचेंगरीत बेळगावातील चार भाविकांचा मंगळवारी मध्यरात्री दुर्दैवी मृत्यू झाला. बेळगावचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर तसेच बेळगाव भाजप नेते किरण जाधव यांनी प्रयागराज प्रशासन यांच्याशी समन्वय साधून सदर मृतदेह आदरपूर्वक त्यांच्या निवासस्थानी विशेष विमानाद्वारे बेळगावला परत पाठविण्याची व्यवस्था केली आहे.
उत्तर प्रदेश येथील दोन पोलिस कॉन्स्टेबल या चार मृतदेहांना दोन वेगवेगळ्या एअर लिफ्ट रुग्णवाहिकांतून सुरुवातीला दिल्ली विमानतळावर जातील त्यानंतर विशेष विमानाने बेळगावला निघतील. सदर विमान बेळगावला विमान तळावर पोहोचण्यास आज गुरुवारी सायंकाळचे ६ वाजतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश सरकार आणि तेथील पोलीसदल कुंभमेळ्यादरम्यान झालेल्या चेंगरा चेंगरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच उपस्थित असलेल्या भाविकांना सुखरूपपणे या संकटातून वाचवण्यासाठी पूर्ण बांधिलकीने काम करत आहेत. प्रयागराज मेडिकल कॉलेजमध्ये मी स्वतः जातीने उपस्थित राहून अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शक्य तितकी सर्व प्रकारची मदत करण्याचा मी प्रयत्न करत आहे. एकमेकांना मदत करण्याची हीच वेळ असून शोकाकुल कुटुंबासोबत आमच्या संवेदना आहेत. असे उत्तर प्रदेश, वाराणासी येथील प्रदेश कार्यसमिति सदस्य, भाजप युवा मोर्चाचे प्रियांशु कुमार तिवारी यांनी खास तरुण भारत न्यूज बेळगावला ही अधिकृत माहिती दिली आहे. कुंभमेळ्यातील घडलेल्या अपघातासंबंधी वेळोवेळी अपडेट्स पाहण्यासाठी तरुण भारत न्यूज या डिजिटल मीडियाला भेट द्या.