For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावच्या 4 भाविकांचा अपघाती मृत्यू

03:09 PM Feb 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेळगावच्या 4 भाविकांचा अपघाती मृत्यू
Advertisement

देवदर्शनाहून परतताना महू-मध्यप्रदेशजवळील मानपूरनजीक काळाचा घाला : 17 हून अधिक भाविक जखमी

Advertisement

बेळगाव : महू-मध्यप्रदेशजवळील मानपूरनजीक (जि. इंदूर) शुक्रवारी पहाटे झालेल्या तिहेरी अपघातात देवदर्शन आटोपून बेळगावला परतणाऱ्या चार भाविकांचा मृत्यू झाला. तर 17 हून अधिक जण जखमी झाले. प्रयागराजमध्ये पुण्यस्नानासाठी गेलेल्या बेळगाव येथील चार भाविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी अपघातात चार भाविक दगावले आहेत. या अपघातातील सर्व जखमींवर इंदूर येथील एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात उपचार करण्यात येत असून मानपूर पोलीस स्थानकात  अपघाताची नोंद झाली आहे. या घटनेने बेळगाव येथील मृतांच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक इंदूरला रवाना झाले आहेत.

ज्योती प्रकाश खेडेकर (वय 64) रा. आनंदनगर-वडगाव, खासगी वाहनचालक सागर परशराम शहापूरकर (वय 40) रा. होसूर बसवाण गल्ली, नीता भाऊ बडमंजी (वय 43) रा. क्रांतीनगर-गणेशपूर, संगीता चंद्रकांत तेली, रा. शिवाजीनगर अशी दुर्दैवी मृतांची नावे आहेत. चारही मृतदेह इंदूरमधील एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व इस्पितळाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. भरधाव खासगी टेम्पोची दुचाकीला धडक बसून टँकरला ठोकरली. त्यामुळे ही भीषण घटना घडली. खासगी टेम्पोमधील सर्व भाविक जखमी झाले आहेत. उज्जैन महाकालचे दर्शन घेऊन शिर्डीकडे जाताना ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. सविता (वय 40), श्रुती (वय 37), स्नेहल (वय 27), लता (वय 62), प्रशांत काकतकर (वय 52), पांडुरंग पाटील (वय 44), शिवराज (वय 31), बसवराज (वय 36), सुनीता (वय 50), मल्लव्वा (वय 60), राजू (वय 63), बबिता (वय 56), शांता (वय 48), शीतल (वय 27), रेणुका (वय 35) या जखमींवर उपचार करण्यात येत आहेत.

Advertisement

बेळगाव येथील 21 भाविक प्रवासी टेम्पोतून 24 जानेवारी रोजी प्रवासाला गेले होते. काशी, अयोध्या, एकविरा, सप्तशृंगीसह महाराष्ट्र, उत्तरप्रदेशमधील पर्यटनस्थळांना भेटी देऊन वाघा बॉर्डरपर्यंतही ते जाऊन आले होते. गुरुवारी 6 फेब्रुवारी रोजी या भाविकांनी उज्जैनमध्ये महाकालेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर शिर्डी साईबाबाला जाऊन तेथून बेळगावला परतण्याचा त्यांचा विचार होता. त्याआधीच त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. गणेशपूर, शहापूर, वडगाव, शिवाजीनगर, विजयनगर परिसरातील भाविकांचा यामध्ये समावेश आहे. ‘तरुण भारत’शी बोलताना जखमी बसवराज पाटील (वय 30) रा.विजयनगर यांनी सांगितले की परतीच्या मार्गावर असताना ही घटना घडले. शिर्डीनंतर आम्ही बेळगावला परतणार होतो. आपल्यासोबत आपली बहीणही जखमी झाली आहे. आमच्यासोबत आलेल्या चौघा जणांचा मृत्यू झाला, याचे आपल्याला दु:ख वाटते.

मृतदेह बेळगावला आणण्याबाबत चर्चा...

इंदूरमधून मृतदेह बेळगावला कसे आणायचे? या विचाराने एकत्र आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिकारी व नेत्यांची भेट घेतली. मल्लेश चौगुले, मंदा नेवगी, रमाकांत कोंडुसकर यांच्यासह अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांनीही जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र येऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. तत्पूर्वी खासदार जगदीश शेट्टर यांच्या स्वीय साहाय्यकांची भेट घेऊन त्यांच्याशीही चर्चा करण्यात आली.

दु:ख सहन करण्याची शक्ती भगवंताने कुटुंबीयांना द्यावीIllegal activities will be restricted

बेळगाव येथील भाविकांच्या वाहनाला मध्यप्रदेशमध्ये झालेल्या अपघातात चौघेजण दगावले आहेत. याचे आपल्याला दु:ख वाटते. दु:ख सहन करण्याची शक्ती भगवंताने त्यांच्या कुटुंबीयांना द्यावी, अशी प्रार्थना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली आहे. यासंबंधी त्यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

दुर्घटनेबाबत आपल्याला दु:ख

भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन चौघेजण दगावले आहेत. अशी घटना व्हायला नको होती. कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत चौघा जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेच देवदर्शन घेऊन बेळगावला परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला झालेल्या अपघातात चौघेजण दगावले आहेत. त्यामुळे आपल्याला दु:ख वाटते. हे दु:ख सहन करण्याची शक्ती भगवंत त्यांच्या कुटुंबीयांना देवो, असे सांगत चिकोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दुखवटा व्यक्त केला आहे.

मृणाल हेब्बाळकर धावले मृतांच्या कुटुंबीयांच्या मदतीला 

महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे चिरंजीव मृणाल हेब्बाळकर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांच्या मदतीला धावले आहेत. कुटुंबीयांची भेट घेऊन इंदूरहून मृतदेह बेळगावला आणण्यासाठी इंदूर प्रशासनाशी चर्चा करण्यात येत आहे. आपण कुटुंबीयांचेही सांत्वन केले आहे. मृतदेह बेळगावला आणण्यासाठी 95 हजार रुपये खर्च येतो. लक्ष्मीताई फाऊंडेशनच्यावतीने मदत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.