संभल दंगलीच्या 4 आरोपींना जामीन
नवी दिल्ली :
संभल दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 4 आरोपींना जामीन मंजूर केला आहे. या चारही आरोपींना मागील वर्षी अटक झाली होती आणि तेव्हापासून ते तुरुंगात होते. या आरोपींची जामीन याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळल्या होत्या, परंतु सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी चारही आरोपींना मोठा दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे सांप्रदायिक हिंसेचा सूत्रधार शारिक साटा विरोधात उत्तरप्रदेश पोलिसांनी कारवाईची तयारी सुरू केली आहे. साटा विरोधात लवकरच रेड कॉर्नर नोटीस जारी होणार आहे. पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा सीबीआय तसेच इंटरपोलसोबत मिळून साटा याला अटक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे संभलचे पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिश्नोई यांनी सांगितले. 24 नोव्हेंबर 2024 रोजी संभलमध्ये स्थानिक लोक आणि सुरक्षा दलांदरम्यान झटापट झाली होती. या झटापटीत 4 जणांचा मृत्यू झाला होता. हिंसेचा मुख्य सूत्रधार शारिफ साटा असल्याचे तपासात उघड झाले होते. ही घटना न्यायालयाच्या आदेशानुसार होत असलेल्या शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान घडली होती.