4 वर्षीय पदवीनंतर थेट पीएचडी करता येणार?
नव्या नियमांमुळे उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात होणार क्रांती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकार उच्च शिक्षण प्रणालीत क्रांतिकारक परिवर्तन आणण्यावर जोर देत आहे. याचनुसार आता चार वर्षांचा नवा पदवी अभ्यासक्रम मांडला जाणार आहे. देशात उच्च शिक्षणाची नियामक संस्था युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (युजीसी) 4 वर्षांमध्ये पूर्ण केल्या जाणाऱया शिक्षणासाठी अभ्यासक्रमासह पीएचडीसाठी नव्या नियमांची अधिसूचना जारी करणार आहे. उच्च शिक्षण प्राप्त करू इच्छिणाऱया लाखो विद्यार्थ्यांवर याचा थेट प्रभाव पडणार आहे.
4 वर्षीय पदवी अभ्यासक्रमाचे नियम अद्याप समोर आले नसले तरीही सूत्रांनुसार 160 क्रेडिटचा हा कार्यक्रम पदवीपूर्व स्तरावर सध्या असलेल्या 3 वषींय चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टीमची (सीबीसीएस) जागा घेईल. विद्यार्थ्यांना हा चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम केल्यावर थेट पीएचडी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे. युजीसीने 10 मार्च रोजीच्या बैठकीत हा निर्णय घेतला होता. याच्या अंतर्गत संशोधनासह 4 वर्षीय अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी आता थेट पीएचडी प्रोग्राममध्ये प्रवेश घेऊ शकतील.
क्लास मोड बदलण्याची सुविधा
याचबरोबर न्यू क्रेडिट सिस्टीममध्ये अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना एका संस्थेतून बाहेर पडत अन्य कुठल्याही संस्थेत प्रवेश घेण्याची सूट असणार आहे. एवढेच नव्हे तर शिक्षणाच्या पद्धतीची बदलता येणार आहेत. म्हणजेच दैनंदिन वर्गात सामील होणारा विद्यार्थी एखादी समस्या उद्भवल्यास ऑनलाईन क्लास किंवा हायब्रिड क्लासचा पर्याय निवडू शकणार आहे.
स्ट्रीम्स बदलण्याचीही सूट
युजीसीच्या ‘करिक्युलर प्रेमवर्क अँड क्रेडिट सिस्टीम फॉर द फोर ईयर अंडरग्रॅज्युएट प्रोग्राम’ अंतर्गत आर्ट्स आणि सायन्स किंवा करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज किंवा व्होकेशनल आणि अकॅडमिक स्ट्रीम्सचा पर्याय निवडता येणार आहे. म्हणजेचा आर्ट्सचा विद्यार्थी कधीच सायन्स अभ्यासक्रमात सामील होऊ शकतो. अशाप्रकारे सायन्सचा विद्यार्थी आर्ट्समध्ये येऊ शकतो. नव्या अभ्यासक्रमांमध्ये भारताचा गौरवशाली इतिहास, याची समृद्ध, विविध, प्राचीन आणि आधुनिक संस्कृती तसेच ज्ञान प्रणाली तसेच परंपरांवर भर असणार आहे.
मास्टर डिग्री एका वर्षात
पदवी अभ्यासक्रम तीन किंवा चार वर्षांचा असणार आहे. यापैकी कुणाची निवड करायची याचा अधिकार विद्यार्थ्यांना असणार आहे. यादरम्यान त्यांना निवडलेल्या अभ्यासक्रमातून बाहेर पडण्याचा आणि अन्य अभ्यासक्रमात प्रवेश करण्याच्या अनेक संधी मिळतील. यामुळे मास्टर आणि पीएचडीचा अभ्यासक्रम आणि कालावधीत लवचिकता येणार आहे. चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणारा विद्यार्थी एक वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि थेट पीचएडीत प्रवेशास पात्र असणार आहे.