जिल्ह्यात 39 हजार बोगस बीपीएल कार्डांचा शोध
अन्न-नागरी पुरवठा खात्याची कारवाई : तब्बल 1.65 कोटी रुपये दंड वसूल, बीपीएलचे एपीएलमध्ये रुपांतर
बेळगाव : खोटी कागदपत्रे पुरवून बीपीएल रेशनकार्ड मिळविलेल्यांना अन्न व नागरीपुरवठा खात्याने दणका दिला आहे. तब्बल 39 हजारहून अधिक बोगस रेशनकार्डे समोर आली आहेत. शिवाय या बीपीएल कार्डांचे रूपांतर एपीएलमध्ये केले जात आहे. जिल्ह्यात बीपीएल 10 लाख 70 हजार, एपीएल 3 लाख 24 हजार तर 68 हजार अंत्योदय रेशनकार्डधारक आहेत. शिवाय 10 लाखांहून अधिक लाभार्थी दरमहा अन्नभाग्य योजनेचा लाभ घेऊ लागले आहेत. मात्र, अनेक धनाढ्यांनी बीपीएल कार्डे मिळवून शासकीय योजनांचा लाभ घेत असल्याचे समोर येऊ लागले आहे. अशांवर कारवाई केली जात आहे. या धनाढ्यांमध्ये आयकर भरणारे, सरकारी कर्मचारी, मोठे जमीनदार, वकील, रेल्वे कर्मचारी, पोलीस कर्मचारी आदींचा समावेश आहे.
एप्रिल 2022 ते ऑक्टोबर 2024 पर्यंत एकूण 39,896 बोगस बीपीएल कार्डे शोधण्यात आली आहेत. यांचे एपीएलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. अन्न व नागरीपुरवठा खात्याने राबविलेल्या शोधमोहिमेत ही अपात्र कार्डे हाती लागली आहेत. अशी बोगस बीपीएल कार्डे रद्द करून त्या ठिकाणी एपीएल कार्डे दिली जात आहेत. शिवाय या बोगस कार्डधारकांकडून तब्बल 1.65 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहितीही अन्न व नागरीपुरवठा खात्याने दिली आहे.
अपात्र कोण?
ज्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 1.20 लाखांपेक्षा अधिक आहे, ज्याच्या मालकीचे व्हाईट बोर्ड चारचाकी वाहन आहे, आयकर भरणारे, तीन हेक्टरपेक्षा अधिक जमीन असणारे, शहरात एक हजार चौरस फुटापेक्षा अधिक घर असलेले, सरकारी नोकरी असलेले बीपीएल कार्डे मिळविण्यास अपात्र आहेत. बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आयटी रिटर्नच्या यादीनुसार 591 बीपीएल कार्डांचा शोध घेऊन ती रद्द करण्यात आली आहेत. दरम्यान, काही लाभार्थ्यांकडून आयटी रिटर्न भरत नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, त्यांची फेरपडताळणी करून त्यांना बीपीएल कार्डे कायम केली जात आहेत.
मृतांच्या नावेही रेशन घेण्याचा प्रकार
काही लाभार्थ्यांकडून मृत झालेल्या व्यक्तीचे नाव रेशनकार्डमधून कमी केले जात नाही. त्यांच्या नावाने येणारे रेशन दरमहा घेतले जात आहे. अशा मृत लाभार्थ्यांची ओळख पटवून 12 हजार 538 नावे कार्डमधून वगळण्यात आली आहेत. शिवाय खोटी कागदपत्रे देऊन बीपीएल कार्डे मिळविलेल्यांचा शोध घेतला जात आहे. बीपीएल रेशनकार्डे रद्द झाल्यास अन्नभाग्य आणि गृहलक्ष्मी योजनांपासूनही वंचित राहण्याची भीती अनेक लाभार्थ्यांना लागली आहे.
कार्डे रद्द केली जात नाहीत
आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनदेखील बीपीएल कार्डे मिळविलेल्या लाभार्थ्यांचा शोध घेतला जात आहे. त्यांची कार्डे जमा करून त्या ठिकाणी त्यांना एपीएल कार्डे दिली जात आहेत. लाभार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी कार्डे रद्द केली जात नाहीत.
- मल्लिकार्जुन नायक (अन्न व नागरीपुरवठा खाते, सहसंचालक)