For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कन्नडसाठी शहरातील 3882 व्यावसायिकांना नोटिसा

10:31 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
कन्नडसाठी शहरातील 3882 व्यावसायिकांना नोटिसा
Advertisement

व्यावसायिकांतून तीव्र नाराजी, नाहक फटका

Advertisement

बेळगाव : आस्थापनांवरील फलकांवर 60 टक्के जागेमध्ये कन्नडमध्येच नाव लिहावे, असा फतवा कर्नाटक सरकारने काढला. त्यानंतर सीमाभागातच त्याबाबत मोहीम राबविण्यात आली. महानगरपालिकेतर्फे गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध आस्थापनांना नोटीस, तसेच फलक जप्त करण्यात आले. आतापर्यंत एकूण 3 हजार 882 आस्थापनांना नोटिसा देण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेतून देण्यात आली आहे. राज्य सरकारने आदेश काढल्यानंतर त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी सरसावले. एरव्ही इतर कामांकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी व कर्मचारी कन्नड भाषेत फलक लिहिण्याबाबत मात्र नोटिसा काढण्यासाठी धडपडले. शहरातील तब्बल 3 हजार 882 जणांना नोटिसा देण्यात आल्या. केवळ या कामासाठी अधिकारी धडपडत होते. शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची, ड्रेनेज व इतर समस्या असताना त्याकडे दुर्लक्ष करून कन्नडसाठीच आटापिटा सुरू होता. आरोग्य विभागाचे अधिकारी, आरोग्य निरीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी या कामाला लागले आहेत. काही जणांचे फलक देखील जप्त करण्यात आले. ट्रेड लायसेन्स किंवा कर जमा करण्याकडे लक्ष दिले असते तर महानगरपालिकेला बऱ्यापैकी महसूल जमा झाला असता. मात्र ते काम करण्याऐवजी कन्नड फलकांसाठी धडपड करण्यात आली. सीमाभागामध्ये मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक राहतात. ग्राहक हा मराठी असल्याने बहुसंख्य व्यावसायिकांनी मराठीतच फलक लावले होते. मात्र त्यांच्यावर दडपशाही करत नोटिसा देण्यात आल्या.

व्यावसायावर परिणाम

Advertisement

महानगरपालिकेचे कर्मचारी कन्नडमध्ये फलक लावा यासाठी व्यावसायिकांवर दबाव घालत आहेत. मराठी भाषिक ग्राहक सर्वाधिक असल्यामुळे कन्नड समजणे अवघड आहे. त्यामुळे व्यवसायावर त्याचा परिणाम झाल्याच्या प्रतिक्रिया व्यावसायिकांतून उमटत आहेत. नाहक त्रास, तसेच भुर्दंड व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे फलक काढून पुन्हा नव्याने करावा लागत आहे. त्याचाही फटका व्यावसायिकांना बसत आहे. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.