ओला इलेक्ट्रिकच्या महसुलात 38 टक्के वाढ
1240 कोटी रुपयांचा महसुल : सप्टेंबर तिमाहीचा निकाल जाहीर
मुंबई :
इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी ओला इलेक्ट्रिकने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. या अहवालात ओला इलेक्ट्रिकच्या महसुलात 38 टक्के वाढ झाली आहे. 30 सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीमध्ये कंपनीने 1240 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.
मागच्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने 896 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला होता. सप्टेंबर 2024 ला संपलेल्या तिमाहीमध्ये कंपनीने 495 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा सहन केला आहे. या आधीच्या वर्षामध्ये समान तिमाहीत कंपनीला 524 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. आर्थिक वर्ष 2025 मध्ये जून तिमाहीत कंपनीचा तोटा 347 कोटी रुपयांचा होता. याचाच अर्थ तोट्यामध्ये सप्टेंबरच्या तिमाहीत वाढ झाली आहे. अभियांत्रिकी आणि निर्मितीच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या कंपनीने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक चालूच ठेवली आहे. आगामी पिढीला उपयुक्त ठरणाऱ्या अशा उत्पादनांच्या विकासावर कंपनीचा भर अधिक दिसतो आहे. सदरच्या तिमाहीमध्ये कंपनीने दुचाकींच्या वितरणामध्ये 73 टक्के वाढ नोंदवली आहे. 98,619 दुचाकी वितरित करण्यात तिमाहीत कंपनीने यश मिळवले आहे. मागच्या वर्षी याच तिमाहीत 56,813 दुचाकींचे वितरण केले गेले.