दोन महिन्यात 37 जणांचा वाहन अपघातात मृत्यू
पणजी : राज्यात दोन दिवसात एका व्यक्तीचा वाहन अपघातात मृत्यू होत असून मृतामध्ये अधिकाधिक युवकांचा सहभाग असल्याने चिंतेची बाब बनली आहे. गेल्या दोन महिन्यात 37 जणांचा वाहन अपघातात मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यात म्हणजे जानेवारी व फेब्रुवारी 2025 या कालावधीत राज्यात एकूण 395 वाहन अपघात झाले आहेत. त्यातील 37 अपघातांमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गंभीर अपघात 47 झाले असून त्यात 52 जण गंभीर जखमी झाले आहेत. 106 किरकोळ अपघात झाले असून त्यात 134 जण किरकोळ जखमी झाले आहेत, तर 206 जण सुखरूप बचावले आहेत. 2024 सालातील याच कालावधीत म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात एकूण 497 वाहन अघात झाले होते. त्यात 49 अपघातात 51 जणांचा मृत्यू झाला होता. 39 गंभीर अपघातात 62 जण गंभीर जखमी झाले होते.
115 किरकोळ अपघातात 156 जण किरकोळ जखमी झाले होते. एकूण 294 जण अपघातात सुखरूप बचावले होते. वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते हेच अपघातांचे मूळ कारण आहे. वाहनचालक निष्काळजीपणाने तसेच अतिवेगाने वाहने चालतात आणि वाहनावरचा ताबा सुटला की अपघात होतो. त्यात स्वत:ला दुखापत करून घेतातच मात्र एखाद्या पादचाऱ्या किंवा समोरून येणाऱ्या वाहनाला विनाकारण अडचणीत आणत असतात. वाहतूक पोलिस वेळोवेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असलेल्या वाहनचालकांना दंड ठोठावत असतात. वाहतूक नियमांबाबत शाळा कॉलेजातून जनजगृती मोहीम राबवली जाते. इतकेच नव्हे तर दर दोन महिन्यांनी विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाई केली जाते.