परदेशात 36, मायदेशात 46
मायदेशातील सर्वात निचांकी धावसंख्या : पहिल्या कसोटीत भारताचा 46 धावांत खुर्दा : बेंगळूरमध्ये किवीज गोलंदाजांचा धमाका :अर्धा संघ शुन्यावर बाद : दुसऱ्या दिवसअखेरीस न्यूझीलंड 3/180
वृत्तसंस्था/बेंगळूर
घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध डरकाळी फोडणारे भारताचे वाघ न्यूझीलंडविरुद्ध मात्र ढेर झाले. बेंगळूरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिला दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण हा निर्णय चांगलाच अंगलट आला आणि संपूर्ण टीम इंडिया अवघ्या 46 धावांवर गारद झाली. किवीज गोलंदाजांसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, घरच्या मैदानावर (मायदेशातील) कसोटी सामन्यातील सर्वात निचांकी धावसंख्या ठरली आहे. आतापर्यंत कसोटी इतिहासात भारताची ही तिसऱ्या क्रमांकाची निचांकी धावसंख्या असून याआधी परदेशात टीम इंडियाचा संपूर्ण संघ 36 धावांत गारद झाला होता.
चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिल्या कसोटीचा पहिला दिवस पावसाने वाया गेला. दुसऱ्या दिवशी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना संपूर्ण भारतीय संघ 46 धावांवर ऑलआऊट झाला. भारताने अवघ्या 34 धावांत सात गडी गमावले होते, ज्यामध्ये पाच फलंदाज खाते न उघडता बाद झाले. दरम्यान, न्यूझीलंडने आपल्या डावाची आक्रमक सुरुवात करताना दुसऱ्या दिवसअखेरीस 50 षटकांत 3 बाद 180 धावा केल्या आहेत. किवीज संघाकडे आता 134 धावांची भक्कम आघाडी असून रचिन रवींद्र 22 तर डॅरिल मिचेल 14 धावांवर खेळत होते. ज्या खेळपट्टीवर 10 भारतीय खेळाडूंनी मिळून 46 धावा केल्या, तिथे न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हॉन कॉनवेने 91 धावा केल्या. कठीण खेळपट्टीवर कॉनवेने आक्रमक खेळ केला.
भारतीय संघ 46 धावांवर ऑलआऊट
गुरुवारी सकाळी रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टीतील ओलाव्याचा फायदा घेत किवी संघाचे तीन वेगवान गोलंदाज टिम साऊदी, मॅट हेन्री आणि विल्यम ओरुरके यांच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडियाचे दिग्गज सपशेल अपयशी ठरले. रोहित शर्मा 2 धावांवर बाद झाला. रोहितला टीम साऊदीने बाद केले. यानंतर ओ‘रुरकेने विराट कोहलीला शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. यानंतर हेन्रीने सर्फराज खानला बाद केले. सर्फराजला खातेही उघडता आले नाही. 10 धावांत तीन विकेट पडल्यानंतर जैस्वाल आणि ऋषभ पंत यांच्याकडून अपेक्षा होत्या. पण हे दोघेही फेल ठरले. दोघांमध्ये 21 धावांची भागीदारी झाली. जैस्वालने 13 तर पंतने 20 धावांचे योगदान दिले. जैस्वाल बाद झाल्यानंतर केएल राहुल क्रीजवर आला. मात्र राहुलला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर रवींद्र जडेजा आणि अश्विनही शून्यावर बाद झाले. बुमराह एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताने अवघ्या 40 धावांत 9 विकेट गमावल्या होत्या. मात्र मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी किवी गोलंदाजांचा काही काळ सामना केला, मात्र या दोघांना आणखी फक्त 6 धावांची भर घालता आली. टीम इंडियाचा पहिला डाव 31.2 षटकांत 46 धावांवर आटोपला.
कॉनवेची आक्रमक खेळी
न्यूझीलंडसाठी कर्णधार टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. लॅथम 15 धावा करून कुलदीप यादवचा बळी ठरला. यानंतर विल यंगसह कॉनवेने डाव सांभाळला. ही जोडी जमलेली असताना यंगला 33 धावांवर जडेजाने बाद केले. कॉनवेने मात्र आक्रमक खेळताना 105 चेंडूत 11 चौकार व 3 षटकारासह 91 धावांचे योगदान दिले. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या कॉनवेला अश्विनने बाद करत भारताला तिसरे यश मिळवून दिले. यानंतर दिवसअखेरीस रचिन रवींद्र व डॅरिल मिचेल यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा किवी संघाने 50 षटकांत 3 बाद 180 धावा केल्या होत्या.
टीम इंडियाची मायदेशातील सर्वात निच्चांकी धावसंख्या
बेंगळूर कसोटीत किवीज गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय संघ 46 धावांत ऑलआऊट झाला. यासह टीम इंडियाची मायदेशातील ही सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. 1987 मध्ये दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघ 75 धावांत ऑलआऊट झाला होता. याआधी भारतीय भूमीवर कसोटी क्रिकेटमधील एका डावातील भारताची ही सर्वात कमी धावसंख्या होती. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाची सर्वात कमी धावसंख्या 36 आहे. 2020 मध्ये भारतीय संघ ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 36 धावांवर ऑलआऊट झाला होता. दुसरी सर्वात कमी धावसंख्या 42 धावा आहे, जी 1974 मध्ये बनली होती. तेव्हा इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत भारत 42 धावांत ऑलआऊट झाला होता.
मायदेशातील भारताची सर्वात निच्चांकी धावसंख्या
- धावा विरुद्ध ठिकाण वर्ष
- 46 न्यूझीलंड बेंगळूर 2024
- 75 वेस्ट इंडिज दिल्ली 1987
- 76 द.आफ्रिका अहमदाबाद 2008
- 83 इंग्लंड चेन्नई 1977
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील भारताची सर्वात निचांकी धावसंख्या
- धावा विरुद्ध ठिकाण वर्ष
- 36 ऑस्ट्रेलिया अॅडलेड 2020
- 42 इंग्लंड लॉर्ड्स 1974
- 46 न्यूझीलंड बेंगळूर 2024
- 58 ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन 1947.
रिषभ पंत दुखापतीमुळे मैदानावर बाहेर
भारतीय संघाला रिषभ पंतच्या रुपात मोठा धक्का बसला आहे. सामना सुरु असताना पंतच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. ही दुखापत एवढी गंभीर होती की, त्याला थेट मैदानाबाहेर जावे लागले. न्यूझीलंडच्या डावातील 37 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पंतसोबत हा अपघात झाला. रवींद्र जडेजा गोलंदाजी करत होता, समोर न्यूझीलंडचा कॉनवे होता. यावेळी जडेजाचा चेंडू थेट पंतच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला लागला. चेंडू लागताच पंत जमिनीवर पडला आणि वेदनेने कळवताना दिसला. यावेळी सामना थांबवण्यात आला आणि पंतला पाहण्यासाठी भारतीय संघाचे फिजिओ धावतच मैदानात आले. पंतला नीट उभेही राहता येत नव्हते. पंत बाहेर गेल्यानंतर ध्रुव जुरेलने विकेटकिंपीग केले.
टीम इंडियाचे पाच हिरो ठरले झिरो
बेंगळूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी किवी गोलंदाजांची धोकादायक गोलंदाजी पाहायला मिळाली. विराट कोहली, सरफराज खान, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांना खातेही उघडता आले नाही. उपाहारानंतर फलंदाजीला आलेला आर. अश्विनही जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही आणि खातेही न उघडता बाद झाला. चिन्नास्वामी स्टेडियमवर टीम इंडियाचे पाच हिरो सपशेल अपयशी ठरले.