चोरी, फसवणूक प्रकरणात 36 आरोपींना अटक
1.27 कोटी रुपयांचे दागिने जप्त : विजापूर पोलिसांची कारवाई
वार्ताहर/विजापूर
विजापूर जिह्यातील विविध मालमत्ता चोरी प्रकरणांमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत 22 वेगवेगळ्या प्रकरणांतील 36 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रु 1.27 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, 2 कार आणि 17 दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले, बसवनबागेवाडी उपविभागातील मुद्देबिहाळ, निडगुंदी, तालिकोटी, बसवनबागेवाडी आणि कुडगी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या शेतातील घरफोडी, मंदिराचे दरवाजे तोडून चोरी, घरफोडी करून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी, मंगळसूत्र हिसकावणे, फसवणूक करून चोरी, मोटारसायकल चोरी तसेच शेतकऱ्यांच्या जमिनीत असलेल्या कूपनलिकांच्या पंपसेट चोरीच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते. या पथकाने आरोपींना अटक केली आहे.
मुद्देबिहाळ पोलीस स्थानक हद्दीतील प्रकरणांमध्ये मुदनाळ परिसरातील शेतातील घरात जयराम नानप्पा नायक यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केली होती. या प्रकरणात रायचूर जिह्यातील जलालनगर, गदवाल रोड येथील गुरुराज उर्फ मोठा गुरु मौनेश (वय 32), एलबीएस नगर रायचूर येथील गुरुकुमार किरणकुमार उर्फ छोटा गुरु मल्लेश (वय 28) आणि बेस्टार पेटे येथील सय्यद अस्लम उर्फ मिन्नू नादरशा (वय 32) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 26 तोळे सोने, 3.5 किलो चांदी, 4,30,000 रुपये रोख आणि गुह्यात वापरलेली इनोव्हा कार असा एकूण रु 51,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
वडिमट्टी गावातील घरफोडीप्रकरण
वडिमट्टी गावातील घरफोडीप्रकरणात देवघरातील 87 ग्रॅम सोन्याचे दागिने, 60 ग्रॅम चांदीचे दागिने आणि 50,000 रुपये रोख अशी सुमारे 7,49,000 रुपयांची चोरी झाली होती. या प्रकरणात बसवराज संगप्पा होक्राणी (वय 34) याला अटक करून त्याच्याकडून 89 ग्रॅम सोने, 110 ग्रॅम चांदी आणि 37,932 रुपये रोख असा 7,55,432 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुद्देबिहाळ ठाण्याच्या आणखी एका प्रकरणात कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या चार अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांच्याकडून 9.5 तोळे सोन्याचे दागिने आणि 1,75,000 रुपये रोख असा 12,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निडगुंदी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील किरश्याळ गावात शेतात काम करत असलेल्या निर्मला उर्फ नीलम्मा प्रभू गबसावळगी (वय 32) यांच्या गळ्यातील 37 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या रमेश यमनप्पा चित्तारगी याला अटक करून 1,95,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले.
5 मोटारसायकली जप्त
तालिकोटी पोलीस स्थानक हद्दीतील तालिकोटी शहरातील गंगा धाब्यासमोर उभी असलेली बजाज पल्सर एनएस-200 (सुमारे 90,000 रुपये किंमत) मोटारसायकल चोरी करणाऱ्या प्रकाश उर्फ हरीश सिद्धण्णा तलवार (जम्मलदिन्नी गाव) याला अटक करून त्याच्याकडून एकूण 5 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. बसवनबागेवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील चिक्कबळ्ळापूर तालुक्यातील नगरगेरे गावचे अनिल रंगनाथ (वय 23) आणि कार्तिक आदिनारायण (वय 28) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 70,000 रुपये किमतीची 1 तोळा सोन्याची बोरमाळ, 70,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. कुडगी पोलीस स्थानक हद्दीतील मसुती गावातील दानम्मा परय्या गणाचारी यांच्या घरात चोरी करणाऱ्या बागलकोट जिह्यातील कलादगी येथील अब्दुल मैनुद्दीन चीनी (वय 30) आणि लोकापूर येथील हिरा हुनसीमरद (वय 29) यांना अटक करून 40 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि सुमारे 4.50 लाख रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
बनशंकरी मंदिरातील चोरी प्रकरण
निडगुंदी पोलीस स्थानक हद्दीतील वंदाल गावातील बनशंकरी मंदिराचा मुख्य दरवाजा तोडून गर्भगृहातील 95,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि सुमारे 40,000 रुपयांची दानपेटीतील रक्कम चोरी करणाऱ्या सोमनाथ नागेश कुची (वय 21) आणि सोलापूर जिह्यातील प्रकाश भीमाशंकर बगली (वय 33) यांना अटक करून त्यांच्याकडून लाखो रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले, अशी माहिती पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.