राज्यात पहिल्या टप्प्यासाठी 358जणांचे अर्ज
आज अर्ज छाननी : 8 एप्रिल माघारीचा दिवस
बेंगळूर : राज्यात पहिल्या टप्प्यात 14 लोकसभा मतदारसंघांमधील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारी संपली. शुक्रवारी अर्जांची छाननी होणार असून माघार घेण्यासाठी 8 एप्रिल हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे त्या दिवशी लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यात 26 एप्रिल रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी केंद्रीयमंत्री शोभा करंदलाजे, माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, माजी मंत्री व्ही. सोमण्णा, गोविंद कारजोळ, खासदार डी. के. सुरेश, म्हैसूरचे राजे यदूवीर वडेयर यांच्यासह 358 जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. दक्षिण कर्नाटकातील उडुपी-चिक्कमंगळूर, हासन, मंगळूर, चित्रदुर्ग, तुमकूर, मंड्या, म्हैसूर, चामराजनगर, बेंगळूर ग्रामीण, बेंगळूर उत्तर, बेंगळूर दक्षिण, बेंगळूर सेंट्रल, चिक्कबळ्ळापूर आणि कोलार या 14 लोकसभा मतदारसंघांत 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीत भाजप-निजदने युती केली असून 14 मतदारसंघांपैकी मंड्या, कोलार व हासन मतदारसंघात निजदने उमेदवार दिले आहेत. तर उर्वरित 11 मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. माजी मुख्यमंत्री आणि निजद प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांनी मंड्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, म्हैसूरचे भाजप उमेदवार यदूवीर वडेयर, माजी मंत्री सी. एस. पुट्टराजू उपस्थित होते. त्याचप्रमाणे भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी बेंगळूर दक्षिणमधून रोड शो करत उमेदवारी अर्ज सादर केला. तुमकूरमधून काँग्रेसचे मुद्दहनुमेगौडा, मंगळूरमधून भाजपचे कॅ. ब्रिजेश चौटा, कोलारमधून काँग्रेसचे एम. व्ही. गौतम आणि निजदचे मल्लेश बाबू, चित्रदुर्गमधून भाजपचे गोविंद कारजोळ, बेंगळूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघातून हृदयरोग तज्ञ डॉ. सी. एम. मंजुनाथ यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज भरला आहे.