ZP School: जि.प. च्या 357 शाळा दर्जेदार करणार, मंत्री आबिटकर यांची माहिती
पुढील पाच वर्षांत 1957 शाळांसाठी 679 कोटींचा निधी लागणार आहे
कोल्हापूर : जिल्हा परिषद शाळांसाठी गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. समृद्ध आणि आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 110 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. यामध्ये इमारती खराब झालेल्या 357 शाळा दर्जेदार करण्यात येणार आहेत. पुढील पाच वर्षांत 1957 शाळांसाठी 679 कोटींचा निधी लागणार आहे. यासाठी सीएसआर, जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधूनही खर्च केला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला.
ग्रामीण आरोग्यसेवेला बळकटी देण्यासाठी ३२ कोटींची तरतूद केल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीची सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी २०२५-२६ या चालू वर्षी विविध विकासकामांसाठी ७६४ कोटी ६२ लाखांच्या निधीला मंजुरी देण्यात आली.
यामध्ये जिल्हा वार्षिक योजनेसाठी ६४२ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) १२० कोटी ५० लाख आणि आदिवासी उपयोजनेसाठी क्षेत्राबाहेरील २ कोटी १२ लाखांचा समावेश आहे. यातील मंजूर निधी मागील वर्षासारखाच तीन टप्प्यात मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.
आबिटकर म्हणाले, प्रशासनातील प्रत्येक विभागाने शासकीय योजना राबवित असताना लोकांच्या सार्वजनिक हिताला प्राधान्य द्यावे. अधिकारी, कर्मचारी वर्गाने लोकांमध्ये जाऊन प्रश्न समजून घेऊन ते सोडवावेत. लोकप्रतिनिधींशी संवाद साधत त्यांनी सूचविलेल्या तसेच सर्वसामान्यांच्या गरजेच्या विषयांना प्राधान्य द्या.
रोजगार हमी योजना, जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना सौर ऊर्जेचा प्रकल्प राबविला जाणार आहे. यामुळे शासनाचा वीज बिलापोटी होणारा सर्व खर्च वाचणार असल्याचेही ते म्हणाले. खासदार शाहू छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, आमदार अरुण लाड, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार डॉ. अशोकराव माने, आमदार शिवाजी पाटील, आमदार राहुल आवाडे, महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकयन एस. आदी उपस्थित होते.
पुरावेळी गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवा
खासदार धैर्यशील माने यांनी पुरावेळी गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणले. यावर मंत्री मुश्रीफ यांनी शासनाच्या वनविभागाने, कृषी विभागाने आणि शेती महामंडळाने आपल्याकडील जमीन चाऱ्यासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना केली. पूरस्थितीची अपडेट माहिती सर्व लोकप्रतिनिधींना द्यावी. जिल्ह्यातील धरणांमध्ये ७० टक्के साठा झाल्यावर जागरूक राहून पुढील नियोजन करा, असेही ते म्हणाले.
शालेय स्तरावर भौतिक सुविधांसह गुणवत्तेवर भर द्या
जिल्हा परिषद शाळांसाठी विशेष मोहिमेंतर्गत गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबविले जाणार असून समृद्ध आणि आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अनुषंगाने भौतिक सुविधांची निर्मिती होत असताना मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी विविध उपक्रमांतून तसेच प्रशिक्षणातून कामे हाती घ्यावीत, अशा सूचना सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी शिक्षण विभागाला दिल्या.
गतवर्षीच्या १०० टक्के निधी खर्च
यावेळी मागील वर्षीच्या ६९६.३३ कोटींच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. यात जिल्हा वार्षिक योजना ५७६ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) ११८ कोटी आणि आदिवासी उपयोजनेसाठी २.३३ कोटी यांचा मंजूर निधी १०० टक्के खर्च झाला आहे.