कृत्रिम रेतनद्वारे 350 मादी वासरांचा जन्म
बेळगाव : कृत्रिम रेतन भरविलेल्या गाईंना मादी जातीचे वासरूच जन्माला यावे, यासाठी ‘मादी वासराची हमी योजना’ अधिक प्रभावीपणे राबविली जात आहे. या अंतर्गत जिल्ह्यात 350 गायींनी मादी जातीच्या वासराला जन्म दिला आहे. बेळगाव जिल्हा यामध्ये आघाडीवर आहे. साहजिकच बेळगाव जिल्ह्याच्या दुग्धोत्पादनात वाढ होणार आहे. पशुसंगोपन खात्यामार्फत नर वासराच्या संगोपनाचा भार कमी करण्यासाठी ही योजना राबविली जात आहे. त्यामुळे पशुपालकांना मादी जातीच्या वासरांची संख्या वाढविणे शक्य होऊ लागले आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे अधिक दूध देणारी वासरांची पैदास होऊ लागली आहे.
परिणामी पशुपालकांना आर्थिक पाठबळ मिळण्यासही मदत होत आहे. मादी वासरू जन्माला आल्यास दूध, तर नर वासरू जन्माला आल्यास शेतीला बळ मिळते. मात्र, अलीकडे केवळ मादी जातीच्या वासरांचे संगोपन केले जात आहे. नर जातीचे वासरू जन्माला येताच त्याची विक्री होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत केवळ गायींनी मादी जातीच्याच वासराला जन्म द्यावा, यासाठी विशेष कृत्रिम रेतन दिली जात आहे. याला पशुपालकांचाही प्रतिसाद मिळू लागला आहे. कृत्रिम रेतन गाईंना भरविली जात आहे. त्यामुळे मादी जातीचे वासरू जन्माला येणार आहे. आतापर्यंत आधुनिक रेतन पद्धतीमुळे जिल्ह्यात 350 मादी जातीच्या वासरांचा जन्म झाला आहे.
जिल्ह्यात 2006 गायींना रेतन
जिल्ह्यात आतापर्यंत 2006 गाईंची रेतनाद्वारे कृत्रिम गर्भधारणा करण्यात आली आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाला पशुपालकांचा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे येत्या काळात मादी जातीची वासरे अधिक प्रमाणात जन्माला येणार आहेत. त्यामुळे मादी जातीच्या वासरांची संख्या वाढून दुग्धोत्पादनातही वाढ होणार आहे. साहजिकच पशुपालकांनाही आर्थिक पाठबळ मिळणार आहे.
-डॉ. राजू कुलेर, सहसंचालक, पशसंगोपन खाते