सुवर्ण रोखेधारकांना 341 टक्के परतावा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताच्या रिझर्व्ह बँकेने सुवर्णरोखे धारकांसाठी अंतिम रिडम्प्शन योजना घोषित केली आहे. या योजनेनुसार या रोखे धारकांना जवळपास 341 टक्के इतका मोठा परतावा मिळणार आहे. हा लाभ त्यांना शासकीय सुवर्ण रोखे 2017-2018 मालिका-एक्स करिता दिला जाणार आहे, या रोख्यांचे वितरण 4 डिसेंबर 2017 या दिवशी करण्यात आले होते. या रिडम्प्शनची किंमत प्रतियुनिट 12 हजार 820 रुपये इतकी निर्धारित करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या इश्यूची किंमत 2 हजार 961 रुपये आहे त्या रोखे धारकांना 332.96 टक्के परतावा मिळणार आहे. तर ज्या इश्यूची किंमत डिस्काऊंट सहित 2 हजार 911 इतकी आहे, त्याच्या धारकांना 340.39 टक्के परतावा किंवा लाभ मिळेल, अशी घोषणा केली गेली.
गुरुवारी अनुमती
गुरुवारी, अर्थात 4 डिसेंबर 2025 या दिवशी या अंतिम रिडम्प्शन योजनेला संमती देण्यात आली. तसेच याची किंमत प्रति युनिट 12 हजार 820 इतकी निर्धारित करण्यात आली आहे. याशिवाय रोखे धारकांना रोखे धारणेच्या काळात प्रतिवर्ष 2.5 टक्के दराने व्याज देण्यात आले आहे. हे व्याज या अंतिम परताव्यात जमेस धरण्यात आलेले नाही, अशी माहिती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली आहे.
किंमत कशी काढण्यात आली...
रिडम्प्शनच्या किमतीचा हिशेब सुवर्णाच्या अंतिम किमतीच्या सरळ सरासरीच्या आधारावर करण्यात आला आहे. सुवर्णाची सरासरी किंमत भारताचा अधिकृत मौल्यवान धातू बाजार आणि सराफ संघटनेने प्रसिद्ध केलेल्या किमतीच्या आधारावर काढण्यात आली आहे. सुवर्ण रोख्यांचे वितरण केल्यापासून आठ वर्षे या योजनेला कालावधी होता. तथापि, त्याआधी पाच वर्षांनंतरही रिडम्प्शन करण्याचीही सोय आहे. हा परतावा पुढच्या व्याजवितरणाच्या वेळी करण्यात येणार आहे.
व्याज करपात्र
सुवर्ण रोखे योजनेत गुंतवणूक केल्यास मिळणारे व्याज करपात्र आहे. मात्र, या योजनेच्या रिडम्प्शनमधून होणारा भांडवलाr लाभ मात्र पूर्णत: करमुक्त आहे. हे रोख हस्तांतरीतही केले जाऊ शकतात. या रोख्यांवर 2.5 टक्के या स्थिर दराने व्याज दिले जाते. वर्षातून दोनदा व्याज रोखेधारकाच्या नावावर जमा केले जाते.
सुवर्णरोखे योजना काय आहे...
केंद्र सरकारने 2015 मध्ये सुवर्ण रोखे योजनेचा प्रारंभ केला होता. या योजनेच्या माध्यमातून कोणीही व्यक्ती प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याच्या स्थानी रोखे घेऊ शकत होता. या रोख्यांवर 2.5 टक्के या स्थिर दराने व्याज दिले जात होते. तर जितक्या किमतीचे रोखे घेतले असतील, त्यांच्यावर सोन्याच्या वाढणाऱ्या दराच्या प्रमाणात रिडम्प्शन दिले जाईल, असे या योजनेचे स्वरुप आहे. प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याची लोकांची सवय कमी करणे, सोन्याची साठेबाजी कमी करणे आणि सोन्यात अडकून निरुपयोगी राहणाऱ्या पैशाचे भांडवलात रुपांतर करणे या तीन महत्वाच्या उद्देशांसाठी ही योजना रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून आणली गेली होती.
योजना आता बंद
2023 पासून केंद सरकारने ही योजना बंद केली आहे. या योजनेची उद्दिष्ट्यो सर्वसाधारणत: साध्य झाली आहेत. तसेच सुवर्ण रोख्यांच्या व्यवस्थापनाचा खर्चही मोठा प्रमाणात वाढला आहे. तसेच आता गुंतवणूकदारांना सुवर्ण रोखे योजनेचे अनेक पर्यायही उपलब्ध आहेत. गोल्ड ईटीएफ, डिजिटल गोल्ड असे अनेक पर्याय आज आहेत. त्यामुळे ही योजना पुढे न चालू ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.