पाकिस्तान, तुर्कियेसह 34 देशांचा ‘ब्रिक्स’साठी अर्ज
भारताचा नव्या सदस्यांच्या समावेशाला असणार विरोध
वृत्तसंस्था/ मॉस्को
ब्रिक्सच्या सदस्यत्वासाठी जगभरात चढाओढ सुरू झाली आहे. रशियाच्या कजान येथे होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेपूर्वी 34 देशांनी या संघटनेच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे. या देशांमध्ये पाकिस्तान, तुर्किये, सीरिया, पॅलेस्टाइन आणि म्यानमार यासारखे देश सामील आहेत. कजानमध्ये 22-24 ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या परिषदेत 10 नव्या सदस्यांना आणि 10 भागीदारांना सामील केले जाऊ शकते असे बोलले जात आहे. हिंसाप्रभावित सीरिया, म्यानमार आणि पॅलेस्टाइन देखील याचे सदस्य होऊ इच्छित आहेत.
ब्रिक्सच्या संस्थापक सदस्यांमध्ये भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे, परंतु यात अनेक नव्या सदस्यांना सामील करण्यात आले आहे. या संघटनेच्या तत्काळ आणि अधिक विस्ताराबाबत भारत प्रतिकूल आहे. तर चीन स्वत:चा अजेंडा पुढे रेटण्यासाठी रशियाचा वापर करून याचे सदस्यत्व वाढवू पाहत आहे.
कजानमध्ये होणाऱ्या बैठकीत सर्वसंमती निर्माण झाल्यावरच नव्या सदस्यांची घोषणा केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ब्रिक्स शिखर परिषदेत भाग घेणार आहेत. मागील 3 महिन्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दुसरा रशिया दौरा ठरणार आहे. या परिषदेत मोदी आणि ब्रिक्स सदस्य देशांच्या प्रमुखांदरम्यान द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात अनेक वर्षांनंतर चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे.
कोणत्या देशांकडून अर्ज?
ब्रिक्सच्या सदस्यत्वासाठी 34 देशांनी अर्ज केला आहे. यात अल्जीरिया, अझरबैजान, बहारीन, बांगलादेश, बेलारुस, बोलिविया, क्यूबा, चाड, इंडोनेशिया, कजाकस्तान, कुवैत, पाकिस्तान, मलेशिया, लाओस, म्यानमार, मोरक्को, नायजेरिया, सेनेगल, दक्षिण सूडान, श्रीलंका, पॅलेस्टाइन, सीरिया, थायलंड, तुर्किये, युगांडा, व्हेनेझुएला, व्हिएतनाम आणि झिम्बाम्बे इत्यादी देश सामील आहेत. यातील अनेक देशांमध्ये चीनचा मोठा प्रभाव असून ते अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पाश्चिमात्य देशांच्या आघाडीला विरोध करतात.
दिग्गज नेते घेणार भाग
सद्यकाळात ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथियोपिया, इराण, युएई आणि सौदी अरेबिया हे ब्रिक्सचे सदस्य देश आहेत. कजानमध्ये होणाऱ्या बैठकीत इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान देखील उपस्थित राहणार आहेत. हा त्यांचा पहिला रशिया दौरा ठरू शकतो. तुर्कियेचे अध्यक्ष रेसेप तैयब एर्दोगान देखील ब्रिक्स परिषदेत भाग घेणार आहेत. सुमारे 24 देशांचे नेते कजानमध्ये एकत्र येणार असल्याचे रशियाने म्हटले आहे. ब्रिक्सचा वापर चीन स्वत:च्या फायद्यासाठी करत असल्याचे विश्लेषकांचे सांगणे आहे.
चीनचा प्रयत्न हाणून पाडणार हे देश
पाश्चिमात्य देशांच्या जी7 च्या विरोधात ब्रिक्सला उभे करण्याचा चीनचा प्रयतन आहे. तर रशिया सध्या युक्रेन युद्धात अडकून पडला असून चीनवर पूर्णपणे निर्भर आहे. या स्थितीचा चीन लाभ उचलत आहे. इस्रायलसोबत युद्धात अडकलेला इराण देखील चीनला साथ देऊ शकतो. चीन स्वत:करता ब्रिक्सचा वापर करण्याचा प्रयत्न करत असला तरीही युएई, भारत आणि सौदी अरेबिया त्याला यात यशस्वी होऊ देणार नाहीत. पाकिस्तान आणि तुर्कियेला ब्रिक्समध्ये सामील करत स्वत:चा प्रभाव वाढविण्याचा चीनचा प्रयत्न आहे. तर भारताचे शेजारी देश असलेले बांगलादेश आणि श्रीलंका देखील ब्रिक्सच्या सदस्यत्वासाठी इच्छुक आहेत. परंतु या देशांवर चीनचा मोठा प्रभाव आहे. अलिकडेच ब्रिक्सचा विस्तार झाला असल्याने काही काळ जाऊ दिल्यावर नव्या सदस्यांना सामील करण्यात यावे असे भारताचे म्हणणे आहे.