इन्फोसिसला 32,403 कोटींची जीएसटी नोटीस
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागाने इन्फोसिसला 32,403 कोटी रुपयांची कर भरण्यासाठीची नोटीस पाठवल्यानंतर, कर अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा आढावा घेण्याचे संकेत दिले आहेत.
या प्रकरणाची माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रत्येक प्रकरणाची सखोलतेने चौकशी केली जाईल. परिपत्रकात नमूद केले आहे की, सेवांच्या आयातीच्या बाबतीत, इनपुट टॅक्स क्रेडिट उपलब्ध असल्यास, व्यवहाराचे खुल्या बाजारात मूल्य शून्य मानले जाईल. त्याअंतर्गत इन्फोसिस पात्र आहे की नाही हे पाहिले जाईल, असे ते म्हणाले.
आयात सेवांवरचा इंटीग्रेटेड जीएसटी कंपनीने भरला नसल्याचे जीएसटी विभागाने म्हटले आहे. त्याशिवाय कंपनीने विदेशात कार्यालये स्थापन केली असून याबाबतचा खर्च हा निर्यातीच्या बिलात दाखवण्यात आल्याबाबत जीएसटीने आक्षेप घेतला आहे. अशा प्रकारच्या खर्चावर जीएसटी लागू होत नसल्याचा दावा इन्फोसिसने केला आहे. 26 जून रोजीच्या जीएसटी कौन्सीलच्या सुचनेनुसार विदेशातील शाखांकरवी भारतात सेवा पुरवली जात असेल तर त्या संबंधीत कंपनीवर कर लागू होत नाही. वरील आकडेवारीची नोटीस जी 32,403 कोटी रुपयांची आहे ती कंपनीच्या 26,233 कोटींच्या नफ्यापेक्षा अधिक असल्याचा उल्लेख इन्फोसिसने केला आहे.