पाकिस्तानमध्ये पुरात 32 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागातील स्वात नदीत अचानक आलेल्या पुरात 16 लहान मुलांसह 32 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक बेपत्ता आहेत. मृतांपैकी 9 जण एकाच कुटुंबातील आहेत. गेल्या 24 तासांत पूर्व पंजाब आणि दक्षिण सिंध प्रांतात पावसाशी संबंधित घटनांमध्ये किमान 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, 17 जणांचे एक कुटुंब स्वात नदीच्या काठावर पिकनिक साजरी करण्यासाठी आले होते. हे लोक नदीपात्रात फोटो काढत असताना अचानक पूर आला. त्यांचे नातेवाईक त्यांना वाचवण्यासाठी धावले, परंतु तेही पुरात अडकले. बचाव पथकांनी 9 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. चार जणांना वाचवण्यात यश आले आहे. पाकिस्तान जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, नदीकाठी 80 हून अधिक बचाव कर्मचारी शोध व मदतकार्यात गुंतले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पर्यटकांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच नद्या आणि ओढ्यांजवळ सुरक्षा वाढवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.