For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छत्तीसगडमध्ये 32 नक्षलवाद्यांना कंठस्नान

06:42 AM Oct 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
छत्तीसगडमध्ये 32 नक्षलवाद्यांना कंठस्नान
Advertisement

बस्तर विभागात सुरक्षा दलाची मोठी कारवाई : दिवसभर जोरदार चकमक-गोळीबार, शस्त्रसाठाही जप्त

Advertisement

वृत्तसंस्था/ नारायणपूर

छत्तीसगडमधील बस्तर विभागातील नारायणपूर भागात सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये शुक्रवारी मोठी चकमक झाली. या चकमकीत 32 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. दिवसभर या भागात जोरदार संघर्ष झडल्यानंतर परिसरात झडती घेऊन जवानांनी नक्षलवाद्यांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि स्वयंचलित शस्त्रेही जप्त केली आहेत. चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या आणखी वाढू शकते.

Advertisement

नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. यानंतर संयुक्त पोलीस दल शोध मोहिमेवर निघाले. या शोधादरम्यान शुक्रवारी दुपारी नारायणपूर-दंतेवाडा पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. सायंकाळी उशिरापर्यंत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. या कारवाईदरम्यान सर्व जवान सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. परिसरात शोधमोहीम सुरूच ठेवण्यात आली आहे. परिसरात झडती घेतल्यानंतर जवानांना घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रेही सापडली.

छत्तीसगडमधील बस्तर भागात नारायणपूर-दंतेवाडा आंतरजिल्हा सीमेवरील अभुजमाडमधील थुल्थुली आणि नेंदूर गावांदरम्यानच्या जंगलात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला, असे बस्तर रेंजचे पोलीस महानिरीक्षक  सुंदरराज पी यांनी सांगितले. त्यानंतर जिल्हा राखीव दल (डीआरजी) आणि विशेष टास्क फोर्सच्या (एसटीएफ) जवानांनी कारवाईत सहभागी होत नक्षलवाद्यांना सळो की पळो करून सोडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सायंकाळपर्यंत एके-47 रायफल आणि एसएलआरसह (सेल्फ-लोडिंग रायफल) जवळपास नक्षलवाद्यांचे मृतदेह चकमकीच्या ठिकाणाहून हस्तगत करण्यात आल्याचेही सुरक्षा सूत्रांकडून सांगण्यात आले. सायंकाळनंतरही सदर भागात अधूनमधून गोळीबार सुरू होता.

सुकमामध्येही मोठी चकमक

छत्तीसगडमधील सुकमा भागात डीआरजी, कोब्रा आणि सीआरपीएफच्या जवानांनी नक्षलवाद्यांचा सामना केला. ही चकमक जिह्यातील चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोअर झोन असलेल्या चिंतावागु नदीच्या काठावर झाल्याचे सांगण्यात आले आहे. बोटालंका, एरनपल्ली आणि आसपासच्या भागात कारवाईसाठी सुरक्षा दलांचे संयुक्त पथक रवाना झाले होते. यावेळी जवानांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर संघर्ष वाढत गेला. परिसरात झडती घेतल्यानंतर जवानांनी नक्षलवाद्यांचा अ•ा उद्ध्वस्त केला. यासोबतच घटनास्थळावरून नक्षलवादी साहित्य आणि स्फोटके जप्त करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी सांगितले.

चकमकींवर वरिष्ठ पातळीवरून नजर

सीआरपीएफचे डीआयजी सुकमा आनंद आणि कोंटाचे डीआयजी सूरजपाल वर्मा हे जवानांच्या सतत संपर्कात आहेत. डीआयजी कमलोचन कश्यप आणि वरिष्ठ अधिकारी सुकमाच्या वॉर रूममधून संपूर्ण कारवाईवर सतत लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालू वर्षात आतापर्यंत बस्तर प्रदेशात वेगवेगळ्या लढायांमध्ये सुरक्षा दलांनी 185 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. या प्रदेशात दंतेवाडा आणि नारायणपूरसह सात जिल्ह्यांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :

.