तीन तासात भाजपचे 31 हजार सदस्य
गोव्यात पाच लाख सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट : प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांची माहिती
पणजी : भाजपच्या सदस्यता मोहिमेस राज्यभरातून उर्त्स्फूत प्रतिसाद मिळत असून सोमवारी पहिल्याच दिवशी केवळ तीन तासातच सुमारे 31 हजार लोकांनी स्वत:ची नोंदणी करून सदस्यत्व स्वीकारले आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली. एकूण 45 दिवसांच्या या मोहिमेच्या माध्यमातून किमान पाच लाख सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट ठेवले असल्याचे ते म्हणाले. मंगळवारी पणजीत भाजप मुख्यालयात त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार देविया राणे, यांच्यासह अन्य मंत्री, आमदार उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते अनेकांना सदस्यत्व बहाल करण्यात आले.
पुढे बोलताना तानावडे यांनी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सदस्य करून घेतल्यानंतर ही मोहीम खऱ्या अर्थाने प्रारंभ झाली, असे सांगितले. त्यानंतरच्या केवळ तीन तासांमध्ये गोव्यातून 31 हजार लोकांनी मिस्ड कॉलद्वारे नोंदणी केली. हा उत्साह आणि प्रतिसाद पाहता उर्वरित 44 दिवसात ही संख्या लाखोंच्या घरात जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सदस्यता नोंदणीचा पहिला टप्पा दि. 25 सप्टेंबरपर्यंत आणि दुसरा टप्पा 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर असा सुमारे दीड महिने चालणार आहे. त्याद्वारे मिस्ड कॉल, पक्षाची वेबसाईट किंवा नमो अॅप, आदींच्या माध्यमातून लोक नोंदणी करू शकतात. आतापर्यंत 31 हजार मिस्ड कॉल देणाऱ्यापैकी 1 हजार लोकांची सदस्यता प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी, भाजपची सदस्यता सर्व धर्मियांसाठी खुली असल्याचे सांगितले. ज्यांना देशसेवा करायची इच्छा आहे त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारावे. भाजपचे अस्तित्व आता केवळ उत्तर भारतापुरतेच मर्यादित राहिलेले नसून दक्षिण भारतातही पक्षाने आपली बाजू भक्कम केली असल्याचे ते म्हणाले.