बांगलादेश विमान दुर्घटनेत 31 जणांचा मृत्यू
वैमानिकाने जीवितहानी टाळण्याचा केला होता प्रयत्न
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशात वायुदलाचे विमान एका शाळेवर कोसळल्यामुळे मोठी जीवितहानी झाली असून बळींचा आकडा 31 वर पोहोचला आहे. मृतांमध्ये 28 विद्यार्थी, शाळेचे दोन कर्मचारी आणि वैमानिक सामील आहे. तर या दुर्घटनेत 165 जण जखमी झाले असून यातील 78 जणांची प्रकृती गंभीर आहे. 20 मृतदेह संबंधितांच्या परिवारांना सोपविण्यात आले आहेत. तर कोसळलेले विमान हे चीनकडून निर्मित एफ-7बीजीआय होते. ढाका येथे ही दुर्घटना सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली होती. तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडली आहे. वैमानिकाने विमान नागरी वस्तीपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला, परंतु हे विमान माइलस्टोन शाळेच्या परिसरात कोसळल्याचे बांगलादेशच्या सैन्याकडून सांगण्यात आले. या दुर्घटनेप्रकरणी बांगलादेशच्या वायुदलाने उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे.
वैमानिकाचा मृत्यू
वैमानिक फ्लाइट लेफ्टनंट मोहम्मद तौकिर इस्लाम यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. संबंधित विमान शाळेच्या इमारतीला धडकले होते. यामुळे तेथे त्वरित आग लागल्याने अनेक विद्यार्थी मृत्यूमुखी पडल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तर दुर्घटनेनंतर मदत करण्याची तयारी भारत तसेच अमेरिकेने दर्शविली आहे.