31.54 लाख चौ. मी. जमीन ‘विकासबंदी क्षेत्र’ रूपांतरणाचा प्रस्ताव
पणजी : राज्य सरकारने नगरनियोजन अधिनियम, 1974 च्या कलम 39-अ(1) अंतर्गत तरतुदींचा वापर करून एकूण 31,54,256 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या चार भूखंडांचे ‘नो डेव्हलपमेंट झोन’ मध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये भातशेती, खाजन जमीन, मिठागरे, फळबागा, खारफुटी इत्यादी पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांचा समावेश आहे. गोवा प्रादेशिक आराखडा 2021 मधील प्रस्तावित क्षेत्रीकरण बदलांमध्ये लोटली येथील खारफुटी आणि भातशेतीचा समावेश असलेल्या 13,01,625 (13 लाख) चौ. मी. जमीन, तिसवाडीतील मोरोंबी-ओ-पिकेन येथील 13,04,343 (13 लाख) चौ. मी. आणि सासष्टी नावेली येथील 1,03,200 (1 लाख) चौ. मी. आणि तिसवाडीतील मुद्रा येथे 4,55,088 (4.55 लाख) चौ. मी. क्षेत्राचा समावेश आहे. या रूपांतरण प्रस्तावासाठी सरकारने 30 दिवसांच्या आत सार्वजनिक सूचना आणि हरकती मागविल्या आहेत. सदर अर्ज मुख्य नगर नियोजक (नियोजन), दुसरा मजला, धेंपो टॉवर, पाटे प्लाझा, पणजी यांच्याकडे पाठवायचे आहेत. त्यानंतर सदर प्रस्ताव सार्वजनिक अभिप्रायासह पुढील निर्णयासाठी टीसीपी मंडळासमोर ठेवण्यात येणार आहेत.