For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंगणवाडीच्या थकीत बिलांच्या मंजुरीसाठी ३० हजारांची लाच; मुख्य सेविकेसह एकावर एसीसीबीची कारवाई

10:27 AM Sep 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
अंगणवाडीच्या थकीत बिलांच्या मंजुरीसाठी ३० हजारांची लाच  मुख्य सेविकेसह एकावर एसीसीबीची कारवाई
Advertisement

इचलकरंजी: बचत गटामार्फत चालविण्यात येणाऱ्या ११ अंगणवाड्यांच्या मागील सहा महिन्यांतील शालेय अन्नपुरवठा योजनेची थकीत बिले मंजूर करून देण्यासाठी ३० हजारांची लाच स्वीकारताना बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील मुख्य सेविकेसह एका खासगी इसमाला एसीबीने (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) इचलकरंजीत पकडले. मेनका मनोहर माने-कोरवी (वय ४४, मुख्य सेविका, महिला-बाल विकास विभाग, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, इचलकरंजी) आणि दीपक दिनकर कांबळे (वय ४९, रा. कोळेकर बिल्डिंग, कोल्हापूर नाका) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

Advertisement

याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, ११ अंगणवाड्यांची ६ महिन्यांची शालेय अन्नपुरवठा योजनेची थकीत बिले मंजुरीसाठी प्रत्येक अंगणवाडीच्या प्रतिमहिना ५०० रुपये याप्रमाणे एकूण ३३ हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. या तक्रारीची पंचांसमक्ष सोमवारी पडताळणी करण्यात आली. त्यावेळी तडजोडीनंतर ३० हजार रुपये देण्याचे निश्चित झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. कारवाईदरम्यान, मुख्य सेविका माने-कोरवी यांनी त्यांच्या कार्यालयातील ठेकेदार दीपक कांबळे याच्याकडे ३० हजार रुपये देण्यास सांगितले. कांबळे याने पंचांसमक्ष लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने त्याला ताब्यात घेतले.

या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखाली संदीप काशीद, सुधीर पाटील, संगीता गावडे, कृष्णा पाटील, वैभव खोत आणि चालक गजानन कुराडे यांच्या पथकाने केली.

Advertisement

Advertisement

.