गणेशोत्सवासाठी 3 हजार पोलिसांची कुमक
उत्सव शांततेत साजरा करण्याचे पोलीस आयुक्तांचे आवाहन
बेळगाव : गणेशोत्सव व ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. शहरामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यानुसार पोलीस आयुक्तालयाकडून अधिकाऱ्यांसह तीन हजार पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली.शहरामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शहरामध्ये गल्लोगल्ली मंडप उभारण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये याबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे.
यासाठी इतर जिल्ह्यातून पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची कुमक मागवून घेतली जाणार आहे. तीन हजार पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये चार पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असून 30 डीवायएसपी, 17 पोलीस निरीक्षक व 2200 पोलीस कर्मचारी यासह इतर कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. नागरिकांनी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याबरोबरच पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. गणेशोत्सव मंडळांनी शांतता व सुव्यवस्था राखून सण साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले. दि. 16 रोजी ईद ए मिलाद असून त्यादृष्टीनेही नियोजन करण्यात आले आहे. सर्व धर्मीय नागरिकांनी उत्सव शांततेत साजरा करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.