‘अन्विता’ चित्रपट ऑडिशन्ससाठी 300 जण उपस्थित
बेळगावसह कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा, पुणे, मुंबई येथून कलाकारांची हजेरी
बेळगाव : ‘अस्मिता क्रिएशन्स’ संस्थेतर्फे निर्मित ‘अन्विता’ चित्रपटासाठी ऑडिशन्स शनिवारी पार पडले. बेळगावसह कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा, पुणे, मुंबई येथून कलाकारांनी ऑडिशन्ससाठी हजेरी लावली होती. याचे उद्घाटन कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सचे डॉ. शंकर सुगते, सचिव ओम किरण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून एंजल फौंडेशनच्या मीना बेनके, अॅड. अश्विनी नावगेकर उपस्थित होत्या.
बेळगावमध्ये स्थानिक होतकरू व उदयोन्मुख कलाकारांना या चित्रपटामध्ये संधी देणार असल्याचे अस्मिता क्रिएशन्सचे प्रमुख राजेश लोहार यांनी सांगितले. लेखक, दिग्दर्शकर संतोष सुतार यांनी चित्रपटाच्या कथेबद्दल माहिती दिली. बेळगावमधील तळागाळातील कलाकारांना वाव देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 300 हून अधिक कलाकार ऑडिशनमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी अभिनय प्रदर्शन केले. त्यांना सदस्य करून घेण्यात आले.
रविवार दि. 6 रोजी सायंकाळी 7 वा. कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी राजेश लोहार यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संतोष सुतार यांनी व अतित बेलेकर यांनी आभार मानले. याप्रसंगी एडिटर प्रशांत सैबण्णावर, कन्नड दिग्दर्शक अभिनेते प्रवीण सुतार, अभिनेता शशिकांत नाईक, महादेव होनगेकर, शिवराज पाटील, साक्षी कणबर्गी, अर्चना पाटणेकर, निखिल शिंदे, विठ्ठल तोरळकर, सुमीत सुतार, अमित लोहार, अँथोनी डिसिल्वा आदी उपस्थित होते.