बंदूकधाऱ्यांच्या हल्ल्यात नायजेरियात 30 ठार
वृत्तसंस्था/ नायजर
नायजेरियातील बंदूकधाऱ्यांनी एका गावाला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. सशस्त्र बंदूकधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात गावात किमान 30 जणांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले आहे. तसेच अनेकांचे अपहरण करण्यात आले आहे. अपहृतांमध्ये मुले आणि महिलांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांत उत्तर नायजेरियात घडलेली अशाप्रकारची ही दुसरी घटना आहे. मृतांचा आकडा 30 इतका असल्याचे सांगण्यात येत असले तरी तेथील एका कॅथोलिक चर्चने या हल्ल्याबाबत गंभीर दावा केला आहे. बंदूकधाऱ्यांनी केलेल्या या हल्ल्यात किमान 40 लोकांचा मृत्यू झाल्याचे चर्चचे म्हणणे आहे. नायजेरियामध्ये अशाप्रकारे घडलेला हा गोळीबाराचा पहिलाच प्रकार नाही. काही महिन्यांपूर्वी, बंदूकधाऱ्यांनी अशाच हल्ल्यात 200 हून अधिक शाळकरी मुले आणि त्यांच्या शिक्षकांचे अपहरण केले होते. बोको हरामने हा हल्ला केल्याचे मानले जात होते.