इराणच्या कोळसा खाणीत स्फोट, 30 ठार
मिथेन वायूची गळती ठरले कारण
वृत्तसंस्था/ तेहरान
इराणच्या एका कोळसा खाणीत झालेल्या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. पूर्व इराणच्या तबासमध्ये असलेल्या एका कोळसा खाणीत ही दुर्घटना झाली असून तेथे मदत अन् बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. कोळसा खाणीत मिथेन वायूच्या गळतीमुळे स्फोट झाला आहे.
संबंधित खाण ही राजधानी तेहरानपासून 335 किलोमीटर अंतरावरील तबास येथे आहे. दुर्घटनेवेळी खाणीत सुमारे 70 जण काम करत होते. आतापर्यंत बळींचा आकडा 30 वर पोहोचला आहे. तर मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
खाणीत अद्याप 24 जण अडकून पडले असून 28 जणांना बाहेर काढण्यास यश आले आहे. इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान यांनी दुर्घटनेवर दु:ख व्यक्त करत बचावकार्याला वेग देण्याचा निर्देश दिला आहे. तसेच या दुर्घटनेच्या चौकशीच आदेश त्यांनी दिले आहेत. इराण स्वत:च्या खाणींमधून दरवर्षी 1.8 दशलक्ष टन कोळसा बाहेर काढतो.