राज्यात 30-40 लाख गृहलक्ष्मी संघ स्थापणार!
महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात 30 ते 40 लाख गृहलक्ष्मी संघ स्थापन करण्याची योजना आहे. याद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनविण्यासाठी पावले उचलली जातील, असे महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
शनिवारी बिदर जिल्हा पंचायत सभागृहातील बैठकीत कलबुर्गी विभाग स्तरावरील महिला-बालकल्याण खात्याच्या दुसऱ्या दिवशीही प्रगती आढावा घेण्यात आला. यंदा राज्यात अंगणवाड्या प्रारंभाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. ऑक्टोबर महिन्यात याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमात गृहलक्ष्मी संघांची अधिकृत घोषणा केली जाईल. गृहलक्ष्मी संघांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याचे प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
महिला-बालकल्याण खात्यात अनेक योजना असून जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पुरेशी पावले उचलली पाहिजेत. आमचे खाते हे जनतेच्या जीवनाला अत्यंत जवळचे असणारे खाते आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी अधिक काळजीपूर्वक काम करावे, असा कानमंत्री मंत्री हेब्बाळकर यांनी अधिकाऱ्यांना दिला.
बालविवाह रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यातील ज्या मुलीने फोन करून बालविवाह रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना फोन केले आहेत, त्या मुलींना बोलावून सत्कार करावा तसेच आर्थिक साहाय्य करावे. यामुळे इतरांनाही मदत होईल. सर्व खात्यांनी हातभार लावला तर ही अनिष्ट प्रथा रोखणे शक्य आहे. जागृती करण्याबरोबर दोषींवर कठोर कारवाई करून भीती निर्माण केली तर बालविवाहांना आळा बसणे शक्य आहे, असे मत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.