30 कोटी लोकांनी केले पॅनला आधार लिंक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मोदी सरकारने 27 जानेवारी 2020 पर्यंत 30 कोटी 75 लाख 2 हजार 824 लोकांनी पॅनकार्डला आधारकार्डशी लिंक केले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी संसदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. पॅनला आधारबरोबर जोडल्यामुळे साहजिकच बनावट पॅनकार्ड रोखण्यात मदत होईल. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेज (सीबीडीटी) यांच्याकडून आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवून 31 मार्च 2020 करण्यात आली आहे. या अगोदर ही तारीख 31 डिसेंबर 2019 होती, अशी माहितीही त्यांनी लोकसभेत दिली.
एका अन्य प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी संसदेत सांगितले की, 24 जानेवारी 2020 पर्यंत 85 टक्के बचत आणि चालू बँक खात्यांना आधारशी लिंक करण्यात आले आहे. त्याचबरोबर 31 डिसेंबर 2019 पर्यंत नॅशलन पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (एनसीपीआय) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, बँकांनी 59.15 कोटी रुपे कार्ड जारी केली आहेत.
यासाठी महत्वपूर्ण
आधारला पॅनकार्ड लिंक करण्याची प्रक्रिया पॅनचा दुरुपयोग आणि संभाव्य कर चोरी रोखण्यास महत्वपूर्ण ठरत आहे. त्याचबरोबर एकापेक्षा अधिक पॅनकार्ड बनविने बंद होणार आहे, असे सरकारद्वारे सांगण्यात आले आहे.