तामिळनाडूत विषारी दारूचे 53 बळी
एकाच गावातील 24 जणांचा मृत्यू : 30 जणांची प्रकृती अद्याप गंभीर : द्रमुक सरकारवर टीकेची झोड
वृत्तसंस्था/ कल्लाकुरिची
तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारूचे प्राशन केल्याने मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा आकडा आता वाढून 53 झाला आहे. मृतांमधील 24 जण तर करुणापुरम या एकाच गावातील आहेत. 20 जून रोजी या सर्व मृतांच्या पार्थिवावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तर वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक जे. संगुमनी यांच्यानुसार रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 30 जणांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. तर दुसरीकडे विषारी दारूची विक्री करणाऱ्या तीन आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तिन्ही आरोप 5 जुलैपर्यंत न्यायालयीत कोठडीत असणार आहेत.
विषारी दारूच्या प्राशनानंतर प्रकृती बिघडलेल्या 100 हून अधिक जणांवर कल्लाकुरिची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह अन्य रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या सर्वांना श्वसनावेळी त्रास, कमी दिसणे आणि तीव्र शरीरदुखीचा त्रास होत आहे.
सीबीआय चौकशीची मागणी
तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी कल्लाकुरिची येथील प्रकरणावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहित सीबीआय चौकशी करविण्याची मागणी केली आहे. तर राज्य सरकारने याप्रकरणी सीआयडी चौकशीचा आदेश दिला आहे. मे 2023 मध्ये तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यात मरक्कनम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यात विषारी दारूमुळे 23 जणांचा मृत्यू झाला होता. मागील 2 वर्षांमध्ये द्रमुक सरकारच्या नाकर्तेपणामुळे विषारी दारूने 60 हून अधिक जणांचा बळी घेतला आहे. राज्यातील द्रमुक सरकारचे विषारी दारू विक्रेत्यांना अभय प्राप्त आहे. द्रमुकचे नेते स्थानिक मद्यविक्रेत्यांशी संगनमत करून आहेत. अवैध मद्यनिर्मितीला द्रमुक नेत्यांचा वरदहस्त आहे. मद्यविक्री न्यायालय, पोलीस स्थानक आणि अन्य शासकीय कार्यालयांनजीकच होतेय असा आरोप अण्णामलाई यांनी केली आहे.
भाजप करणार आर्थिक मदत
तामिळनाडू भाजपच्या वतीने सर्व पीडित परिवारांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. अमित शाह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी याप्रकरणी आम्हाला अहवाल सोपविण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी प्रभावित लोकांची भेट घ्यावी. स्टॅलिन यांनी स्वत:च्या 2021 च्या निवडणूक घोषणापत्रात तामिळनाडूत मद्याचीविक्री कमी करण्याचे आश्वासन दिले होते. याच्या उलट तामिळनाडूत मद्याचीविक्री दरवर्षी 18-20 टक्के वाढत असल्याचा आरोप अण्णामलाई यांनी केला आहे. भाजपकडून शनिवारी द्रमुक सरकारविरोधात राज्यव्यापी निदर्शने करण्यात येणार आहेत.
स्टॅलिन यांनी स्वीकारावी जबाबदारी
विषारी दारूमुळे लोकांचा जीव गेला असून या घटनेची जबाबदारी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी स्वीकारावी. दरवर्षी विषारी दारूमुळे जाणाऱ्या बळींची संख्या वाढत आहे. सरकारच्या वरदहस्ताशिवाय अशाप्रकारची घटना घडणे अशक्य असल्याचा दावा व्ही.के. शशिकला यांनी केला आहे. विषारी दारूमुळे सुमारे 200 लोकांची प्रकृती बिघडली होती, यातील 133 जणांवर उपचार सुरू आहेत. तर रुग्णालयात दाखल होणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. कल्लाकुरिची अवैध मद्याचे केंद्र असल्याचा आरोप अण्णाद्रमुकचे नेते पलानिसामी यांनी केला आहे.
अण्णाद्रमुककडून निदर्शने
राज्यातील मुख्य विरोधी पक्ष अण्णाद्रमुककडून 24 मे रोजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या मागणीवरून राज्यव्यापी निदर्शने करण्यात येणार आहेत. स्टॅलिन यांनी विषारी दारू प्रकरणाची जबाबदारी स्वीकारावी आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा असे अण्णाद्रमुकने म्हटले आहे.