चिन्नास्वामी स्टेडियमवरील आयपीएल सामन्यांसाठी आमदारांना 3 तिकिटे
केएससीएच्या पदाधिकाऱ्यांशी उपमुख्यमंत्र्यांची चर्चा
बेंगळूर : चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांसाठी आमदारांना प्रत्येकी तीन तिकिटे देण्यास कर्नाटक राज्य क्रिकेट मंडळाने (केएससीए)ने संमती दर्शविली आहे. आमदारांनी चार ते पाच तिकिटे उपलब्ध करण्याची मागणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सोमवारी केएससीए, डीएनए मॅनेजमेंट व आरसीबीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी अनेक आमदारांनी पक्षभेद विसरून आमदारांना चार ते पाच तिकिटे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी केली होती. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्र्यांनी केएससीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आमदारांना शनिवारच्या आरसीबी विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यासाठी दोन तिकिटे देण्यास संमती दर्शविली होती.
सोमवारी डी. के. शिवकुमार यांच्या बेंगळुरातील निवासस्थानी केएससीएचे अध्यक्ष वेंकटेश प्रसाद, आरसीबीचे पदाधिकारी व डीएनए मॅनेंजमेंटच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी आयपीएल सामन्यांची तिकिटे व चिन्नास्वामी स्टेडियमबाबत चर्चा झाली. बैठकीवेळी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणाऱ्या प्रत्येक आयपीएल क्रिकेट सामन्यांसाठी आमदारांना तीन तिकिटे आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांची दोन तिकिटे देण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना डी. के. शिवकुमार म्हणाले, आमदारांना आयपीएलची तिकिटे देण्यासंबंधी विधानसभा अध्यक्षांशी चर्चा केली होती. आजच्या (सोमवार) बैठकीत बेंगळूरमध्ये होणाऱ्या प्रत्येक आयपीएल सामन्यासाठी आमदारांना प्रत्येकी तीन तिकिटे देण्यास केएससीएने संमती दर्शविली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने असताना दोन तिकिटे दिली जातील, असे केएससीएने सांगितल्याचे ते म्हणाले.