श्रीराम मंदिर पुजारी पदासाठी 3 हजार अर्ज
275 अर्जदारांची घेतली जाणार मुलाखत : राम मंदिरात लवकरच प्राणप्रतिष्ठा सोहळा
वृत्तसंस्था/ अयोध्या
श्रीराम जन्मभूमी मंदिरात पुजारी म्हणून भरल्या जाणाऱ्या 12 पदांसाठी 3 हजार जणांनी अर्ज केले आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने पुजारी पदासाठी अयोध्येच्या परिसरातील वास्तव्याची अट ठेवली होती. ट्रस्टने आता 275 अर्जदारांना मुलाखतीसाठी बोलाविले आहे. या उमेदवारांना 6 महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. सध्या मुख्य पुजाऱ्याला 32,900 रुपये तर सहाय्यक पुजाऱ्यांना 31,900 रुपये इतके प्रतिमहिना वेतन मिळते.
संबंधित अर्जदारांना त्यांच्या पात्रतेच्या आधारावर मुलाखतीसाठी बोलाविण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरि यांनी दिली आहे. संबंधित अर्जदारांची मुलाखत तीन सदस्यीय समितीकडून घेतली जाणार आहे. मुलाखतीची प्रक्रिया अयोध्येतील विश्व हिंदू परिषदेचे मुख्यालय कारसेवकपुरमध्ये पार पडणार आहे. या समितीत वृंदावनचे प्रसिद्ध हिंदू उपदेशक जयकांत मिश्रा आणि अयोध्येतील दोन महंत मिथिलेश नंदिनी शरण तसेच सत्यनारायण दास सामील आहेत.
मुलाखतीद्वारे पुजारीकार्यासाठी 20 उमेदवारांची निवड होणार आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 6 महिन्यांचे आवासीय प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावरच त्यांना पुजारी म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच राम जन्मभूमीत विविध पदांवर तैनात केले जाणार आहे. प्रशिक्षणात भाग घेणाऱ्या परंतु निवड न होऊ शकलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
निवडण्यात आलेल्या 20 उमेदवारांना अयोध्येतील कारसेवकपुरममध्ये 6 महिन्यांपर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाचे स्वरुप संतांकडून तयार करण्यात आलेल्या धार्मिक अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना मोफत वास्तव्य अन् भोजनसुविधा मिळणार आहे. तसेच मानधन म्हणून दर महिन्याला 2000 रुपये दिले जाणार असल्याचे गिरि यांनी सांगितले आहे.