For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारचालकावरील जीवघेण्या हल्लाप्रकरणी तिघा जणांना अटक

11:58 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
कारचालकावरील जीवघेण्या हल्लाप्रकरणी तिघा जणांना अटक
Advertisement

आणखी एक आरोपी उपचाराधीन : चौकशीनंतर कळणार नेमके कारण

Advertisement

बेळगाव : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे चिरंजीव मृणाल हेब्बाळकर यांच्या कारचालकावर चाकूहल्ला केल्याच्या आरोपावरून कॅम्प पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपीही जखमी असून तो उपचार घेत आहे. उपचारांती त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मंगळवार दि. 6 जानेवारी रोजी दुपारी 2.15 वाजता बसवंत गणपती कडोलकर यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला. हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी चौघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आले होते. यापैकी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे.

शिवय्या ऊर्फ शिवा संगय्या पुजारी (वय 34) राहणार कलमेश्वरनगर, गोजगा, मोनाप्पा दयानंद पाटील (वय 32) राहणार बोकडे कॉलनी, बेळगुंदी, संपत यल्लाप्पा कडोलकर (वय 31) राहणार राकसकोप रोड, बेळगुंदी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पचे पोलीस निरीक्षक आनंद वणकुद्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी संपत कडोलकर हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. उपचारांती त्याला अटक करण्याची तयारी पोलिसांनी ठेवली आहे. घटनेनंतर केवळ 24 तासांत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपींना पोलीस कोठडीत घेण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिली.

Advertisement

बसवंत कडोलकर या युवकावर कोणत्या कारणासाठी हल्ला करण्यात आला? मायनिंग व्यवहारातून ही घटना घडली आहे का? या प्रश्नांची उत्तरे देताना अटक करण्यात आलेल्या तिघा जणांना पोलीस कोठडीत घेऊन त्यांची चौकशी केल्यानंतरच हल्ल्याचे खरे कारण स्पष्ट होणार आहे, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. ही घटना घडली त्यावेळी आयपीएस अधिकारी रविंद्र गडादी तेथून जात होते. हल्लेखोरांना पाहून त्यांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आरोपी तेथून पळून गेल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. मोनाप्पा व संपत यांच्या चिथावणीमुळे शिवय्या ऊर्फ शिवा व त्याच्या साथीदारांनी हा हल्ला केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

Advertisement
Tags :

.