Satara : वाई येथे काळूबाईचरणी ३ लाख भाविक नतमस्तक
काळूबाईच्या चरणी ९५ लाखांची देणगी दोन दिवसांत जमा
वाई : आई काळूबाईच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषात आणि गुलालाच्या उधळणीत वाई येथील श्री क्षेत्र मांढरदेवी काळूबाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे. यात्रेचा आज तिसरा दिवस असून, सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून लाखो भाविकांनी गडावर गर्दी केली आहे. गेल्या दोन दिवसांत ३ ते साडेतीन लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले असून, काळूबाईच्या चरणी १५ लाखांची रोख देणगी जमा झाली आहे. यात्रेच्या निमित्ताने देवीला भाविकांकडून मौल्यवान दागिने अर्पण केले आहेत. पुणे येथील मालन कराळे (कारेगाव) यांनी ३० हजार रुपये किमतीचा १५७ ग्रॅमचा, तर राघव शिंदे यांनी ४० हजारांचा चांदीचा हार देवीला अर्पण केला.
संपूर्ण मंदिराला आशिष भगेरिया (पुणे) यांच्याकडून आकर्षक विद्युत रोषणाई, तर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मनमोहक फुलांची सजावट करण्यात आली आहे.चांदीच्या हारांसह दोन दिवसांत ९५ लाखांची देणगी काळूबाईच्या चरणी अर्पणगडावर जागोजागी लावलेल्या देवी जागरणाच्या गाण्यांनी वाताबरण प्रसन्न झाले आहे. भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान ट्रस्टने जय्यत तयारी केली आहे. ५ हजार किलो लाडूंचे वाटप करण्यात येत आहे. तसेच, केवळ ३० रुपयांच्या कूपनवर भाविकांना महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे.
सुरक्षेसाठी १०० कमांडो, २०० होमगार्ड आणि ८० पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे. विशेष म्हणजे, बंदोबस्तावरील जवानांच्या जेवणाची सोय देवस्थान ट्रस्टने केली आहे. गडावर ४ ते ५ रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाच्या ५ गाड्या तैनात आहेत. प्रशासनाने यंदा कडक नियमावली लागू केली आहे. मांढरगडावर पशुहत्येला पूर्णतः बंदी घालण्यात आली असून, त्याचे काटेकोर पालन होत आहे. गावाजवळ पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.