जयपूर-दिल्ली महामार्गावर बस-ट्रॉली धडकेत 3 ठार
46 जण जखमी, 17 जणांना जयपूरला हलविले
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानमधील कोटपुतली येथील कंवरपुरा स्टँडजवळ जयपूर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर बस आणि ट्रॉलीची जोरदार धडक झाली. या अपघातात बस चालकासह तिघांचा मृत्यू झाला. तर 46 प्रवासी जखमी झाले. प्राथमिक उपचारानंतर यातील 17 जखमींना गंभीर स्थितीत जयपूरला हलविण्यात आले आहे.
स्लीपर बसमध्ये प्रवास करणारे लोक दादा स्वामींच्या सत्संगासाठी अजमेरहून दिल्लीला जात होते. अजमेरहून निघाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरून बस दिल्लीच्या दिशेने जात असताना तिची पुढे जाणाऱ्या ट्रॉलीला धडक बसली. कंवरपुरा स्टँडजवळ बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना शासकीय बीडीएम जिल्हा ऊग्णालयात दाखल केले.
अपघातात जखमी झालेले बहुतांश प्रवासी अजमेर येथील रहिवासी आहेत. दिल्ली सत्संगात सहभागी होण्यासाठी अजमेरहून लोक तीन-चार बसमधून निघाले होते. त्यापैकी एका बसचा अपघात झाल्याचे कोटपुतली पोलीस ठाण्याचे अधिकारी राजेश शर्मा यांनी सांगितले. अपघातानंतर चालक ट्रॉलीसह पळून गेला. त्याचा शोध सुरू आहे.