पाकिस्तानात बाँबस्फोटात 3 जण ठार
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा या प्रांतात झालेल्या हातबाँब स्फोटात 3 जणांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती जखमी झाला आहे. हा दहशतवादी हल्ला आहे काय याची चौकशी केली जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पाकिस्तानाच्या पश्चिम भागात पाकिस्तान सरकारविरोधात आंदोलन भडकले आहे. दोन आठवड्यांपूर्वी बलुचिस्तान प्रांतात एका रेल्वेचे अपहरण करण्यात आले होते. या रेल्वेतील 200 हून अधिक सैनिकांना ठार केल्याचा दावा बलोच लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेने केला आहे. या घटनेनंतर पाकिस्तानच्या वायव्य आणि पश्चिम भागांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. बलुचिस्तानला स्वातंत्र्य देण्यात यावे, अशी मागणी या भागातील जनता करीत आहे. तसेच खैबर पख्तुनख्वा या प्रांतातही पाकिस्तानी सरकारच्या विरोधात मोठा असंतोष खदखदत आहे. या असंतोषाचा केव्हाही भडका उडू शकतो, असा इशारा पाकिस्तानच्या संसदेत लोकप्रतिनिधींनीही काही दिवसांपूर्वी दिला होता. पाकिस्तान सरकारने बलोच लिबरेशन आर्मीचे दावे फेटळले असले, तरी ते सरकार दबावाखाली आहे, हे स्पष्ट दिसत आहे, असे मत आंतरराष्ट्रीय तज्ञांनी व्यक्त केले आहे.