मालदीव सर्वोच्च न्यायालयाचे 3 न्यायाधीश निलंबत
मुइज्जू सरकारची मोठी कारवाई
वृत्तसंस्था/ माले
मालदीवमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांना निलंबित करण्यात आले आहे. मालदीवियन ज्युडिशियल सर्व्हिस कमिशनने न्यायालयाचे तीन न्यायाधीश हुसनुसुद, महज अली जहीर आणि डॉ. आज्मीराल्डा जहीर यांना निलंबित केले आहे. भ्रष्टाचारविरोधी आयोगाच्या चौकशीनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
मालदीवच्या न्यायिक सेवा आयोगाने एसीसीच्या चौकशीनंतर अनुच्छेद 25 (आय) अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. हे निलंबन थेट स्वरुपात भ्रष्टाचाराच्या चौकशीशी निगडित असल्याची पुष्टी आयोगाच्या एका सदस्याने दिली आहे. हा निर्णय संसदेत झालेल्या कायदादुरुस्तीनंतर घेण्यात आला आहे. यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या 7 वरून कमी करत 5 करण्यात आली होती.
मालदीवच्या घटनेनुसार नैतिक तत्वांचे उल्लंघन करत नाही तोवर न्यायाधीशांना त्यांच्या पदावरून हटविता येत नाही. न्यायिक सेवा आयोगाला न्यायाधीशांच्या गैरवर्तनाचे पुरावे मिळाल्यास त्यांना पदावरून हटविता येते. न्यायिक सेवा आयोग एक स्वायत्त संसथा असून जी न्यायपालिकेशी निगडित प्रकरणांमध्ये अध्यक्ष अन् संसदेला सल्ला देत असते.