बांगलादेश सीमेवर 3 कोटींचे सोने जप्त; एकाला अटक
वृत्तसंस्था/ बरासत
पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगना जिल्ह्यातील भारत-बांगलादेश सीमेवर 3.9 कोटी रुपयांच्या सोन्याचे बार आणि विटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आंग्रेल सीमा चौकी परिसरातील हल्दारपारा येथून बीएसएफच्या जवानांनी 4.82 किलो वजनाच्या दोन सोन्याचे बार आणि 30 सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत, अशी माहिती लष्कराने दिली. दोन्ही देशांमधील नैसर्गिक सीमा असलेल्या इचमती नदीवर बांगलादेशकडून भारतात येताना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी तीन व्यक्तींना पाहिले. दरम्यान, बीएसएफच्या जवानांनी त्यांचा पाठलाग केल्याने दोघे पळून गेले तर एकाला पकडण्यात यश आले.
प्रोसेनजित मंडल असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याला नदी पार करून सोने भारतात आणण्यासाठी एका व्यक्तीने 500 रुपये दिले होते. मंडल हा बांगलादेशच्या दिशेने निघाला तेव्हा एक व्यक्ती सोन्याची बिस्किटे आणि बार घेऊन त्याची वाट पाहत होता. पुढील कायदेशीर कारवाईसाठी बीएसएफने त्याला महसूल गुप्तचर संचालनालयाकडे (डीआरआय) सोपवले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.