अमेरिकेत कमावलेले पैसे भारतात पाठवण्यावर 3.5 टक्के कर
‘वन बिग, ब्युटीफुल बिल अॅक्ट’ मंजूर
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेत कमावलेले पैसे भारतात पाठवण्यावर 3.5 टक्के कर लागू करण्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. यापूर्वी 5 टक्के कर प्रस्तावित होता. अमेरिकन प्रतिनिधी सभागृहाने 22 मे रोजी ‘वन बिग, ब्युटीफुल बिल अॅक्ट’ मंजूर केला. सिनेटच्या मंजुरीनंतर 1 जानेवारी 2026 पासून हा कायदा लागू होईल. या विधेयकात परदेशी कामगारांनी त्यांच्या देशात पाठवलेल्या पैशावर कर लावण्याची तरतूद आहे.
अमेरिकन संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या प्रतिनिधी सभागृहाने ‘वन बिग, ब्युटीफुल बिल अॅक्ट’ मंजूर केला आहे. हे एक कर विधेयक असून ज्याअंतर्गत अमेरिकेत काम करणाऱ्या परदेशी कामगारांनी त्यांच्या देशात पाठवलेल्या पैशावर (रेमिटन्स) कर लावला जाईल. जवळपास 1,116 पानांचा हा कायदा ट्रम्प यांच्या सीमा सुरक्षा, कर आणि खर्चाबाबतच्या धोरणांची झलक दर्शवितो. हे विधेयक ट्रम्प यांच्या 2017 च्या कर कपातीचा विस्तार करण्याचा प्रयत्न आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या नवीन धोरणाचा भारतावर सर्वात जास्त परिणाम होऊ शकतो, कारण भारतीय स्थलांतरित अमेरिकेतून सर्वाधिक पैसे पाठवतात.
करकपातीचा दिलासा
हे विधेयक अमेरिकेत राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या आणि देशाबाहेर पैसे पाठवणाऱ्या लाखो परदेशी कामगारांना दिलासा देणारे ठरणार आहे. विधेयकाच्या अंतिम आवृत्तीत रेमिटन्स कर 5 टक्क्यांवरून 3.5 टक्के करण्यात आला आहे. अनेक आठवडे चाललेल्या वाटाघाटींनंतर रेमिटन्स करात ही कपात करण्यात आली. रेमिटन्स कर म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशाला पैसे पाठवण्यावर आकारला जाणारा कर. याचा परिणाम अमेरिकेत मोठ्या संख्येने राहणाऱ्या भारतीय स्थलांतरितांवर आणि साहजिकच भारताच्या अर्थव्यवस्थेवर होईल.
अमेरिकन नागरिकांसाठी सूट
ट्रम्प यांच्या या नवीन विधेयकानुसार रेमिटन्स कर फक्त बिगर अमेरिकन नागरिकांवर लागू होईल. अमेरिकन नागरिकांना यातून सूट मिळणार आहे. प्रभावित झालेल्यांमध्ये ग्रीन कार्ड धारक आणि रोजगार व्हिसावरील लोकांचा समावेश असेल. म्हणजेच, जर अमेरिकेत राहून पैसे कमवणारी कोणताही भारतीय व्यक्ती त्याच्या कमाईतून 5,000 रुपये देखील आपल्या गावी किंवा शहरात पाठवत असेल तर त्याला त्यावर कर भरावा लागेल. तसेच अमेरिकेतून भारतात 1 लाख रुपये पाठवायचे असल्यास त्यावर स्थलांतरितांना 3,500 रुपये कर भरावा लागेल.