सुपारी साठ्याच्या नावे साडेतीन कोटी उचलले
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बँकेकडून गोकुळ रोड पोलिसात तक्रार
त. भा. वार्ताहर/ हुबळी
गोदामात सुपारीचा साठा असल्याचे सांगत त्यासाठी आवश्यक पावत्या देऊन एका बँकेतून साडेतीन कोटी रुपये कर्ज काढून त्याची परतफेड न करणाऱ्या सहा जणांविरुद्ध गोकुळ रोड पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
गोकुळ रोड येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा व्यवस्थापक अविनाश ताडे यांनी हावेरी येथील नागवेणी टी. आर., अविनाश गि•ण्णावर, शिवलिंगाप्पा गुमती, सुनील बोळन्नावर, बसवराजप्पा गि•ण्णावर व गोदामाची मालकीण भाग्यम्मा चळगेरी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
गोदामात 1 हजार 800 पोत्यांमधून 1 हजार 450 क्विंटल सुपारीचा साठा आहे, असे सांगत यासाठी आवश्यक पावत्या बँकेत हजर करून 2024 च्या 1 ते 8 ऑगस्टपर्यंत साडेतीन कोटी रुपये कर्ज उचलले आहे. भाग्यम्मा चळगेरी हिरेकेरुर येथील गोदामात सुपारीचा साठा असल्याचे दाखवण्यात आले होते. उर्वरित पाच जणांच्या कर्जासाठी त्या जामीनदार होत्या.
कर्ज उचलल्यानंतर त्याची परतफेड करण्यात आली नाही. सुपारीचा साठाही बँकेकडे सोपविण्यात आला नाही. बँकेची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सहा जणांविरुद्ध गोकुळ रोड पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करून सुपारीचा साठा ताब्यात घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी गोदामात गेले असता त्यांना धमकावण्यात आले आहे. कर्ज उचलण्यासाठी दाखविण्यात आलेली सुपारी इतर ठिकाणी हलवण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.