10 कंपन्यांच्या बाजार भांडवलात 3.48 लाख कोटींची वाढ
एचडीएफसी बँक, भारती एअरटेलच्या मूल्यात दमदार वाढ : तीनच दिवस झाले होते कामकाज : रिलायन्स आघाडीवर
वृत्तसंस्था/ मुंबई
दहा कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये 3.84 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. एचडीएफसी बँक आणि भारती एअरटेल या दोन कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यांमध्ये सर्वाधिक वाढ झालेली पाहायला मिळाली.
सेन्सेक्स 3395 अंकांनी तेजीत
गुरुवारी संपलेल्या आठवड्यात 30 समभागांचा समावेश असणारा मुंबई शेअरबाजाराचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक तब्बल 3395 अंकांनी म्हणजे 4.51 टक्के वाढत बंद झाला होता दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 1023 अंकांनी म्हणजे 4.48 टक्के इतका दमदार वाढत बंद झाला. गुरुवारी संपलेल्या आठवड्यात शेअर बाजारातील आघाडीवरच्या 10 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 3 लाख 84 हजार 4 कोटी रुपयांनी वाढले होते.
का राहिली तेजी
महागाईचा कमी झालेला स्तर त्याचप्रमाणे देशात यंदा सरासरीपेक्षा चांगला मान्सून होणार असल्याने या बाबी शेअर बाजाराला तेजी राखण्यामध्ये महत्त्वाच्या ठरल्या आहेत. त्याचप्रमाणे अमेरिकेकडून काही उत्पादनांवर व्यापार शुल्कामध्ये सवलत देण्यासंदर्भातल्याही हालचाली बाजाराला मजबूत राखण्यासाठी सहाय्यक ठरल्या होत्या.
एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यामध्ये 76 हजार 483 कोटी रुपयांनी वाढत 14 लाख 58 हजार 934 कोटी रुपयांवर पोहोचले होते. यानंतर दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलचे बाजार भांडवल मूल्य 75 हजार 210 कोटी रुपयांनी वाढत 10 लाख 77 हजार 241 कोटी रुपयांवर पोहोचले होते. बाजारातील आघाडीवरची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य 74,766 कोटींसह वाढत 17 लाख 24 हजार 768 कोटी रुपयांवर पोहोचले होते.
बाजार भांडवल मूल्याच्या यादीमध्ये पाहता रिलायन्स इंडस्ट्रीज ही आघाडीवरची कंपनी आहे. आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल मूल्य याच दरम्यान 67,597 कोटींनी वाढत 10,01,948 कोटी रुपयांवर स्थिरावले होते.
स्टेट बँकेसह टीसीएस, आयटीसीचे मूल्य वाढले
सरकारी बँक स्टेट बँकेचे बाजार भांडवल मूल्य 38,420 कोटींनी वाढत 7,11,381 कोटी रुपयांवर पोहचले. तर टीसीएसचे 24,114 कोटींसह 11,93,588 कोटींवर तर बजाज फायनान्सचे 14,712 कोटींसह 5,68,061 कोटी रुपयांवर वाढले होते. एफएमसीजी कंपनी आयटीसीचे बाजार मूल्य 6820 कोटींच्या वाढीसह 5,34,665 कोटी रुपयांवर तर आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे मूल्य 3987 कोटींच्या वाढीसोबत 5,89,846 कोटी रुपयांवर पोहचल्याचे दिसले. हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल मूल्य 1,891 कोटी रुपयांच्या वाढीसह 5,57,945 कोटी रुपयांवर पोहचले होते.