लार्सन टुब्रोला 2947 कोटीचा नफा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लार्सन आणि टुब्रो यांनी आपला डिसेंबरअखेरचा तिमाही निकाल नुकताच जाहीर केला आहे. याअंतर्गत कंपीनीने आर्थिक वर्ष 2024 मध्ये डिसेंबरच्या तिसऱ्या तिमाहीत 2947 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. सदरच्या नफ्यात मागच्या समान अवधीतील नफ्यापेक्षात 15 टक्के वाढ दर्शवली गेली आहे. पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि आयटी व टेक सेवांच्या कार्यात झालेली वाढ हे कारण नफा वाढीसाठी ठरले असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने डिसेंबरच्या तिमाहीत 19 टक्के वाढीसह 55,128 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. बाजारातील तज्ञांनी मांडलेल्या अंदाजानुसार मात्र महसुल गोळा करण्यात कंपनीला यश आलेले नाही. याच दरम्यान कंपनीने तिसऱ्या तिमाहीतच एक मोठे कंत्राटही प्राप्त केले होते. जवळपास 75 हजार 990 कोटी रुपयांचे कंपनीने कामाचे कंत्राट प्राप्त केले आहे. मागच्या वर्षाच्या याच अवधीतील ऑर्डरची नोंद बघितल्यास 25 टक्के ऑर्डरमध्ये वाढ दिसली आहे. मागच्या वेळी याच अवधीत कंपनीने 60 हजार कोटी रुपयांचे कामाचे कंत्राट प्राप्त केले होते. डिसेंबरअखेरपर्यंत कंपनीकडे 4 लाख 69 हजार 807 कोटी रुपयांच्या कामाचे कंत्राट एकंदर प्राप्त झालेले असून आंतरराष्ट्रीय कामाचे प्रमाण यात 39 टक्के इतके आहे, अशी माहितीही एल अँड टी यांनी दिली आहे.