For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कडोली ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी तब्बल 29 लाखांचा दंड

11:17 AM Sep 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
कडोली ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी तब्बल 29 लाखांचा दंड
Advertisement

रोहयोतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर : ग्रा. पं. अध्यक्षांसह 8 जणांवर कारवाई, ओंबुड्समन यांचा आदेश

Advertisement

बेळगाव : कडोली ग्राम पंचायतीच्या व्याप्तीत रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचे निदर्शनास आल्याने ओंबुड्समन न्यायालयाकडून ग्रा. पं. अध्यक्षांसह तालुका पंचायत अधिकाऱ्यांना 29 लाख 19 हजार 663 रुपयांचा दंड ठोठावून वसुलीचा आदेश जारी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून रोजगार हमी योजनेत होणारा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. कडोली ग्रा. पं. अंतर्गत राबविण्यात आलेल्या रोहयोमध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार राजू मायाण्णा यांच्यासह 9 सदस्यांनी जि. पं. कडे दाखल केली होती. त्यानुसार कडोली ग्रा. पं. च्या रोजगार हमी योजनेतील कामांची चौकशी हाती घेण्यात आली होती.

अधिकाऱ्यांनी ग्रा. पं. ला भेट देऊन पाहणी करून चौकशी हाती घेतली होती. कामाच्या ठिकाणी जाणे अशक्य असल्याने कामांचे फोटो पाहून चौकशी करण्यात आली. कागदोपत्रावरून काम झाल्याचे दिसून आले आहे. मात्र कामासाठी वापरण्यात आलेले साहित्य संशयास्पद आढळून आले आहे. नदीतील गाळ काढण्यासाठी 21 दिवस ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला आहे. प्रतिदिवस 3 हजार रुपये भाडे देण्यात आले आहे. 1 लाख 26 हजार भाडे मिळाल्याची मौखिक माहिती देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करून गाळ काढण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. ट्रॅक्टरबरोबर ट्रॉलीचा वापर करून सामग्री पुरवठा करण्यात आल्याची खोटी माहिती व बनावट कागदपत्रे निर्माण करून जि. पं. कडून अनुमोदन मिळविण्यात आले आहे. ही बाब तक्रारदारांच्या तक्रारीतूनही निदर्शनास आली आहे.

Advertisement

दंड ठोठावून दिली कडक सूचना

सर्व माहिती व दिसून आलेल्या त्रुटींच्या आधारावर बनावट माहिती दिली असल्याचे तपासातून निदर्शनास आले आहे. बेकायदेशीर कामे करून पैसे काढण्यात आले असल्याचे आढळून आल्याने ग्रा. पं. अध्यक्ष, पंचायत विकास अधिकारी, तांत्रिक साहाय्यक अभियंता, संगणक ऑपरेटर यांच्यावर दंडात्मक कारवाईचा आदेश बजावण्यात आला आहे. कडोली ग्रा. पं. अध्यक्ष सागर पाटील 8 लाख 73 हजार 799, पीडीओ कृष्णाबाई भंडारी 8 लाख 73 हजार 799, रोहयोंतर्गत 1000 रुपये, ता. पं. साहाय्यक अभियंता शिवानंद मडिवाळ 8 लाख 73 हजार 799, नरेगा अंतर्गत 1000 रुपये, साहाय्यक कार्यकारी अभियंता सुंदर बी. कोळी 100 रुपये, नलिनी नायक 2 लाख 91 हजार 226, नरेगा अंतर्गत 1000 रुपये, ता. पं. अधिकारी राजेंद्र मोरबद, सविता एम., नागराज यरगुद्दी यांना प्रत्येकी 1000 रुपये दंड ठोठावून कडक सूचना करण्यात आली आहे. ओंबुड्समन डॉ. डी. एस. हवालदार यांनी हा आदेश बजावला आहे.

Advertisement
Tags :

.