युपीत तीन दिवसात तीव्र थंडीचे 29 बळी
उत्तर भारतात कडाक्याची थंडी, हिमवृष्टी
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तर प्रदेशात थंडीमुळे गेल्या तीन दिवसात म्हणजेच 72 तासांत 29 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या हिमवृष्टीमुळे संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी जाणवत आहे. बुधवारी हवामान खात्याने मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानसह 9 राज्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासांत चार जणांचा मृत्यू झाल्याची नेंद झाली आहे. येथील 16 जिह्यांमध्ये थंडीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अनेक जिह्यांमध्ये पाऊस आणि गारपीटही होऊ शकते, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील 35 शहरांमध्येही 10 अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. राजस्थानच्या नागौरमध्ये तापमान 2.5 अंशांवर पोहोचले. तापमानात घट होण्याबरोबरच देशातील 17 राज्यांमध्ये दाट धुके दिसून येत आहे. बुधवारी सकाळी दिल्लीत काही ठिकाणी शून्य दृश्यमानता नोंदवण्यात आल्यामुळे अनेक उ•ाणे आणि रेल्वेगाड्यांना विलंब झाला. जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवर बर्फ साचला असून श्रीनगर-लेह रोड, मुगल रोड, सेमथान-किश्तवाड रोड पूर्णपणे बंद आहे.