"गरिबांच्या पोटातील होळीला पोळीचा नैवेद्य"
वाकरेत सलग २८ व्या वर्षी विधायक उपक्रम
कोल्हापूरः (वाकरे)
"होळीला पुरणपोळीचा नैवेद्य" अर्पण करण्याऐवजी "गोरगरिबांच्या पोटातील होळीला पोळीचा नैवेद्य" दाखवण्याचा अभिनव उपक्रम वाकरे (ता. करवीर) येथील ग्रामस्थांनी सलग २८ व्या वर्षी कायम ठेवला. या उपक्रमाला ग्रामस्थांचा शंभर टक्के प्रतिसाद लाभला.
पूर्वीपासून वाकरे येथील ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग मंदिरासमोर सामुदायिक आणि सार्वजनिक होळी पेटवण्याची प्रथा आहे. त्यासाठी संपूर्ण गावातून गोवऱ्या जमा करून होळी पेटवली जाते. त्यानंतर संपूर्ण गावातील घराघरातील पुरणपोळ्या, भात, नारळ असा नैवेद्य होळीमध्ये अर्पण करण्याची परंपरा गावात होती. मात्र होळीत टाकल्या जाणाऱ्या नैवेद्यामुळे हजारो पुरणपोळ्या, भात आणि नारळांची नासाडी होते, म्हणून हा नैवेद्य गोरगरिबांना देण्यासाठी ग्रामस्थांचे परिवर्तन करण्याचा निर्णय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, कुंभी कासारी बँकेचे संचालक व स. ब. खाडे महाविद्यालयाचे निवृत्त प्रा.एस.पी.चौगले यांनी २७ वर्षांपूर्वी शिवाजी चौगले व विजय पाटील यांच्या साथीने घेतला. गेली सलग अठ्ठावीस वर्षे यशस्वीपणे हा उपक्रम चालू आहे. यावर्षीही गावातील नैवेद्याच्या हजारो पुरणपोळ्या, भात, नारळ एकत्र करून रात्रीच गोरगरिबांना वाटण्यात आला. या अन्नाची नासाडी होण्याऐवजी हे अन्न गोरगरीब लोकांना दान करण्याचे पवित्र कार्य ग्रामस्थ करीत आहेत.
सरपंच अश्विनी पाटील, उपसरपंच अमर करपे, प्रा. एस. पी. चौगले यांच्या हस्ते व चंद्रकांत पाटील, सदस्य विजय पाटील- माळी, शिवाजी चौगले, आनंदा गुरव, नागेश शिंदे, नवनाथ पोवार, संदीप उर्फ पोपट पाटील, रणजित गुरव, अभिजित गुरव, आनंदा देवरे, मारुती चौगले, कृष्णात तोडकर, आबासो चौगले, तानाजी येरुडकर, योगिता करपे, वर्षा पाटील, दिपाली पाटील, क्लार्क अजित पाटील, तानाजी तोडकर यांच्या उपस्थितीत पुरणपोळ्या व नैवेद्य वाटप करण्यात आला. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.