For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंडणगडात 275 माकडे पकडून सोडली नैसर्गिक अधिवासात

04:32 PM Mar 07, 2025 IST | Radhika Patil
मंडणगडात 275 माकडे पकडून सोडली नैसर्गिक अधिवासात
Advertisement

मंडणगड : 

Advertisement

शहरातील नागरिक व तालुक्यातील शेतकऱ्यांना होणारा माकडांचा उपद्रव लक्षात घेऊन वनविभागाच्यावतीने 28 फेब्रुवारीपासून तालुक्यात वनविभागाच्यावतीने माकडे पकडण्यासाठी विशेष अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत 275 माकडे पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या अभियानांतर्गत मंगळवारी शहरात कार्यवाही करण्यात आली.

उपविभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनरक्षक प्रियांका लगड, दापोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान तालुक्यात आठ दिवस राबवण्यात येणार आहे. या अभियानात तालुक्यात माकडांची संख्या अधिक असलेली ठिकाणी शोधण्यात आली आहेत. त्या ठिकाणी माकडांना खाद्यपदार्थांचे आमिष दाखवून पिंजऱ्यात पकडण्यात येत आहे. पिंजऱ्यातील माकडांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्यात येते. मंगळवारी शहरातील गांधी चौक येथे पिंजरा लावून 50 माकडे पकडण्यात आली. वनपाल अनिल दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक ओमकार तळेकर, अमोल ब्रिहाडे, समाधान गिरी व सहकारी पाटील यांनी ही कार्यवाही यशस्वी केली. यावेळी नगराध्यक्षा अॅड. सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, राहुल कोकाटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. तालुक्यातील सोवेली, वेळास, बाणकोट, वेसवी, उमरोली, शिपोळे गावात अभियान राबवून 275 माकडांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.