छत्तीसगडमध्ये 27 माओवाद्यांचा खात्मा
एक कोटी रुपयांचे इनाम असणारा माओवादी ठार
वृत्तसंस्था / रायपूर
छत्तीसगड आणि ओडीशा राज्यांचा सीमारेषेवर सुरक्षा दलांच्या सैनिकांनी 27 माओवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये 1 कोटी रुपयांची इनाम शीरावर असणारा माओवादीही ठार झाला आहे. त्याचे नाव जयराम ऊर्फ चलपती असल्याची माहिती देण्यात आली आहे. सुरक्षादले आणि माओवादी यांच्यातील ही चकमक मंगळवारी गारीयाबंद जिल्ह्यातील वनप्रदेशात झाली आहे. या कारवाईसाठी ड्रोनचाही उपयोग करण्यात आला असून माओवाद्यांच्या हालचालींवर ड्रोनमधून लक्ष ठेवत त्यांना टिपण्यात येत आहे.
या माओवादी विरोधी अभियानात केंद्रीय राखीव पोलीस दल आणि छत्तीसगड तसेच ओडीशा या राज्यांच्या विशेष कृती दलांनी भाग घेतला होता. विशिष्ट स्थानी 60 हून अधिक माओवादी लपलेले आहेत, अशी माहिती गुप्तचरांकडून मिळताच या तिन्ही दलांच्या तुकड्यांनी हे संयुक्त अभियान हाती घेतले. माओवादी लपलेल्या स्थानाला वेढा घालण्यात आला आणि सर्व माओवाद्यांना शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. तथापि, शरण न येता माओवाद्यांनी सुरक्षा सैनिकांवरच गोळीबार केल्याने त्यांनी केलेल्या कारवाईत 20 माओवादी ठार झाले.
संख्या वाढण्याची शक्यता
मंगळवारी रात्री उशीरापर्यंत ही चकमक होत होती. लपलेल्या माओवाद्यांची संख्या अधिक असल्याने चकमक अधिक काळ चालली. ठार झालेल्या माओवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता त्यामुळे व्यक्त केली जात आहे. दोन सुरक्षा सैनिकही या चकमकीत जखमी झाले आहेत. मात्र, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्र सरकारने आणि छत्तीसगड सरकारने या भागातून माओवाद्यांचे उच्चाटन करण्याची योजना सज्ज केली असून मंगळवारचे अभियान हा याच योजनेचा एक भाग होता, अशीही माहिती देण्यात आली आहे.
1 जानेवारीपासूनच अभियान
नक्षलवादी आणि माओवाद्यांविरोधातील हे अभियान 1 जानेवारी 2025 पासूनच हाती घेण्यात आले आहे. गेल्या 20 दिवसांमध्ये या अंतर्गत 40 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. काही सुरक्षा सैनिकही या कारवाईत हुतात्मा झाले आहेत. माओवादाचा नि:पात होईपर्यंत हे अभियान संपणार नाही. आतापर्यंत 25 टक्क्यांहून अधिक माओवादी संपले आहेत, असे प्रतिपादन करण्यात आले आहे.
नेत्यांकडून अभिनंदन
20 माओवाद्यांना यमसदनी धाडण्याच्या या कारवाईसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय राखीव पोलीसदल आणि छत्तीसगड, तसेच ओडीशा पोलिसांच्या विशेष कृती दलाचे अभिनंदन केले आहे. छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनीही ‘एक्स’ या माध्यमावरुन सुरक्षा सैनिकांचे अभिनंदन पेले. माओवादी ही देशाला लागलेली कीड असून ती लवकरात लवकर संपणे आवश्यक आहे, अशा अर्थाची प्रतिक्रिया या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली आहे. छत्तीसगडमध्ये सक्रिय माओवाद्यांची संख्या 200 हून अधिक असावी असे अनुमान काही तज्ञांनी व्यक्त केले असून हे अभियान प्रदीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे.
दोन वर्षांमध्ये मोठे यश
छत्तीसगड आणि आसपासच्या भागांमध्ये 2023 पासूनच माओवाद विरोधी अभियान हाती घेण्यात आले आहे. 2024 मध्ये छत्तीसगडमध्ये 219 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. याच काळात काही माओवादी शरण आल्याने त्यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न करण्यात येत आहे. छत्तीसगड राज्यातील बस्तर जिल्हा हा माओवाद्यांचा अ•ा समजला जातो. त्यामुळे याच भागावर सुरक्षा दलांनी अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. गस्त वाढविण्यात आली असून केंद्रीय दलांच्या अधिक तुकड्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. येत्या दोन वर्षांमध्ये येथील नक्षलवाद आणि माओवाद नियंत्रणात आणण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.