For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहशतवादी हल्ल्यात इराणमध्ये 27 ठार

07:00 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
दहशतवादी हल्ल्यात इराणमध्ये 27 ठार
Advertisement

चाबहार, रस्कमध्ये चकमक : मृतांमध्ये 11 सुरक्षा कर्मचारी

Advertisement

वृत्तसंस्था /तेहरान

इराणमधील चाबहार आणि रस्क शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 11 सुरक्षा कर्मचारी आणि 16 नागरिक अशा एकंदर 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे 10 सुरक्षा अधिकारी जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री हा हल्ला झाल्याची माहिती इराणच्या सरकारी माध्यमांनी गुरुवारी दिली आहे. जैश-अल-अदलच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. मृतांमध्ये 2 पोलीस अधिकारी, 2 सीमा रक्षक आणि 7 सैनिकांचा समावेश आहे. दहशतवाद्यांना चाबहारमध्ये उपस्थित असलेल्या सीमा रक्षकांच्या मुख्यालयावर कब्जा करायचा होता. मात्र, त्यांना त्यांच्या योजनांमध्ये यश मिळू शकले नाही. यावेळी झालेल्या चकमकीत इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सने (आयआरजीसी) आतापर्यंत 15 दहशतवाद्यांना ठार केल्याचे इराणचे उप आंतरिक मंत्री माजिद मिरहमादी यांनी सांगितले. चाबहारप्रमाणेच रस्कमध्येही दहशतवाद्यांनी धुडगूस घातल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला लागून असलेल्या इराणच्या सीमेवर अनेक दिवसांपासून दहशतवादी हल्ले होत आहेत. या काळात सुन्नी दहशतवादी आणि ड्रग्ज तस्करांशी इराणी सैनिकांची अनेकदा चकमक झाली आहे. गेल्यावषी डिसेंबरमध्ये इराणमधील रस्क शहरात दहशतवाद्यांनी पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. यामध्ये 11 सुरक्षा जवान हुतात्मा झाले होते. इराणमधील हल्ल्याचा पाकिस्तानने निषेध केला आहे. पाकिस्तानचे राजदूत मुदस्सीर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ‘इराणवर झालेल्या 2 दहशतवादी हल्ल्यांमध्ये अनेक सुरक्षा अधिकारी मारले गेले. दहशतवादाविरोधातील लढाईत आम्ही इराणसोबत आहोत’, असे म्हटले आहे. इराण हा शिया बहुसंख्य देश आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानातील सुन्नी संघटना इराणला विरोध करत आहेत. बलुचिस्तानमधील जैश-अल-अदल संघटना यापैकी एक आहे. तेथील दहशतवाद्यांनी अनेकवेळा इराणच्या सीमेत घुसून तेथील लष्करावर हल्ले केले आहेत. जैश-अल-अदलचे बहुतांश दहशतवादी हे इतर पाकिस्तानी दहशतवादी संघटनांमधून आलेले आहेत. जैश अल-अदलने फेब्रुवारी 2019 मध्ये इराणी सैनिकांच्या बसवरही हल्ला केला होता. या हल्ल्यात अनेक इराणी सैनिक मारले गेले होते. त्यापूर्वी ऑक्टोबर 2018 मध्ये या दहशतवादी संघटनेने 14 इराणी सैनिकांचे अपहरणही केले होते.

Advertisement
Tags :

.