कोचीमध्ये 27 बांगलादेशी घुसखोरांना अटक
ऑपरेशन क्लीन अंतर्गत पोलिसांची कारवाई
वृत्तसंस्था/ कोची
केरळच्या कोची शहर परिसरात अवैध स्वरुपात वास्तव्य करत असलेल्या 27 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. एर्नाकुलम जिल्ह्याच्या उत्तर परवून भागात एर्नाकुलम ग्रामीण पोलीस आणि दहशतवादविरोधी पथकाकडुन राबविण्यात आलेल्या संयुक्त मोहिमेत या बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे.
बांगलादेशी नागरिक पश्चिम बंगालमधील कामगार असल्याचे भासवून विविध ठिकाणी काम करत होते. अटक करण्यात आलेल्या घुसखोरांकडे विस्तृत चौकशी केली जात असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
ऑपरेशन क्लीन या विशेष मोहिमेच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. तर एर्नाकुलम ग्रामीण जिल्हा पोलीस प्रमुख वैभव सक्सेना यांनी दोन आठवड्यांपूर्वी 28 वर्षीय तस्लीमा बेगमला अटक केल्यावर ही मोहीम हाती घेण्यात आली होती. उत्तर परवूरमध्ये बांगलादेशी घुसखोर राहत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांच्या पथकाने एटीएसच्या मदतीने शोध घेतला. दस्तऐवजांची पडताळणी करण्यात आली असता संबंधित लोक हे बांगलादेशी घुसखोर असल्याचे स्पष्ट झाले. बांगलादेशी नागरिक अवैध स्वरुपात वास्तव्य करत होते आणि स्वत:ला भारतीय नागरिक ठरवत होते असे एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
बांगलादेशी घुसखोर पश्चिम बंगालमध्ये सीमा ओलांडून दाखल झाले होते. तेथून त्यांनी कोची येथे पोहोचण्यासाठी एजंटांच्या माध्यमातून आधारकार्ड आणि इतर दस्तऐवज प्राप्त केले होते. हे बांगलादेशी घुसखोर विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत होते, यातील काही जण कामगारांच्या शिबिरांमध्ये राहत होते. त्यांच्या कारवायांबद्दल चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. चालू महिन्यात एर्नाकुलम ग्रामीण जिल्हा पोलीस हद्दीत ताब्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढून 34 झाली आहे.