छत्तीसगडमध्ये 26 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
13 नक्षलवाद्यांवर होते 65 लाखाचे इनाम : 7 महिलांचा समावेश
वृत्तसंस्था/ सुकमा
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 26 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांपैकी 13 जणांवर एकूण 65 लाख रुपयांचे इनाम होते. या नक्षलवाद्यांमध्ये 7 महिलाही सामील असून त्यांनी ‘पूना मार्गेम’ पुढाकाराच्या अंतर्गत आत्मसमर्पण केले असल्याची माहिती सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी बुधवारी दिली.
नक्षलवाद्यांच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलजीए) बटालियन, दक्षिण बस्तर डिव्हिजन, माड डिव्हिजन आणि आंध्र ओडिशा सीमा डिव्हिजनमध्ये हे नक्षलवादी सक्रीय होते आणि ओडिशाच्या सीमावर्ती भागांमधील अनेक हल्ल्यांमध्ये सामील होते. हे नक्षलवादी राज्य सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणाने प्रभावित झाले होते असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.
लाली उर्फ मुचाकी
लाली उर्फ मुचाकी आयते लखमू (35 वर्षे) ही एका कंपनी पार्टी समितीची सदस्य होती, तिच्यावर 10 लाख रुपयांचे इनाम होते. मुचाकी हिंसेच्या अनेक मोठ्या घटनांमध्ये सामील होती, यात 2017 मधील कोरापटू रोडवर (ओडिशा) एका वाहनाला लक्ष्य करत करण्यात आलेला आयईडी स्फोट सामील आहे. या हल्ल्यात 14 जवान हुतात्मा झाले होते. चार अन्य प्रमुख नक्षलवादी हेमला लखमा (41 वर्षे) अस्मिता उर्फ कमलू सन्नी (20), रामबती उर्फ पद्म जोगी (21 वर्षे) आणि सुंदरम पाले (20 वर्षे) या चारही जणांच्या विरोधात प्रत्येकी 8 लाख रुपयांचे इनाम घोषित करण्यात आले होते.
मिनपा हल्ल्यात होता हात
लखमा हा 2020 च्या मिनपा हल्ल्यात सामील होता, या हल्ल्यात 17 जवानांना हौतात्म्य आले होते. आत्मसमर्पण करणाऱ्या अन्य नक्षलवाद्यांपैकी तीन जणांवर प्रत्येकी 5 लाख रुपयांचे इनाम होते. एका नक्षलवाद्यावर 3 लाख रुपयांचे इनाम होते. आत्मसमर्पण करणाऱ्या सर्व नक्षलवाद्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत करण्यात आली असून सरकारच्या धोरणानुसार पुढील काळात त्यांचे पुनर्वसनही करण्यात येणार आहे. नक्षलवादाचा मार्ग सोडून संबंधित लोकांनी मुख्य प्रवाहात सामील व्हावे असे आवाहन करत पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी त्यांना सुरक्षा आणि सन्मानजक आयुष्याचे आश्वासन दिले आहे