सोमवारी आणखी 26 भटक्या कुत्र्यांना अँटीरेबिज लसीकरण
बेळगाव : मनपा व पशुसंगोपन खात्यातर्फे सोमवार दि. 6 रोजी कामत गल्ली, चव्हाट गल्ली, शेट्टी गल्ली व परिसरातील 26 भटक्या कुत्र्यांना पकडून अँटीरेबिज लस देण्यात आली. रविवारी एक दिवस मोहीम बंद ठेवली होती. सोमवारपासून पुन्हा कुत्र्यांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बेळगाव शहर व उपनगरात सुमारे 12 हजारहून अधिक भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. मात्र कुत्र्यांवर नियंत्रण मिळविण्यास मनपाला अपयश आले आहे. त्यातच कुत्र्यांकडून होणारे नागरिकांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. परिणामी नागरिकांमध्ये भीती निर्माण झाल्याने भटक्या कुत्र्यांना अँटीरेबिज लस देण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. कामत गल्ली, चव्हाट गल्ली, शेट्टी गल्ली व परिसरातील 26 कुत्र्यांना पकडून लस दिली. मनपा पशुसंगोपन विभागाचे वरिष्ठ पशुनिरीक्षक राजू संकण्णावर यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबविली जात आहे.